नाशिक - शहरातील बँक लुटीबरोबरच एटीएम मशिन फोडण्याचे लोन ग्रामीण भागातही पोहोचले आहे. बुधवारी मध्यरात्री पेठ शहरातील सप्तशृंगी नगर भागातील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला होता. मात्र, हातोडी, स्क्रूड्रायव्हरच्या साह्याने एटीएम फोडण्याचा त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला. या प्रकरणी दोघा आरोपींनी अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी सीसीटीव्हीत फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरु केला होता. खबऱ्यामार्फत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, नासर्डी पूल परिसरातून राजेश बाळू खाणे (वय २८, आंबेडकर वाडी) यास अटक केली. त्याने पेठ येथील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडल्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
चौकशीनंतर पोलिसांनी साथीदार अंबादास पवार, बोधले नगर यासही ताब्यात घेतले आहे. पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तो गजाआड झाल्यामुळे अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.