नाशिक - नाशिक पोलिसांनी 31 डिसेंबरच्या अनुषंगाने टवाळखोरांविरोधात मोहीम रावबवली होती. पोलिसांनी टवाळखोरांना चांगलाच धडा शिकवला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. दरम्यान यापुढील काळात देखील ही मोहीम अशीच चालू राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी दिली आहे.
नाशिक शहरात टवाळखोरांचा उद्रेक वाढला असून, रस्त्यावर उभे राहून महिलांची छेड काढणे, सार्वजनिक ठिकाणी दारू पीने, हाणामाऱ्या करणे, परिसरात दहशत निर्माण करणे यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. याची गंभीर दखल पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी निर्भया पथकाला अशा टवाळखोरांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निर्भया पथकाकडून अशा टवाळखोरांना चोप देऊन, धडा शिकवण्यात येत आहे.
टवाळखोरांविरोधात कारवाई सुरूच राहणार
नाशिकमध्ये टवाळखोरांवर वचक राहण्यासाठी निर्भया पथकाच्या माध्यमातून शहरात ठिकठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. तसेच शाळा, महाविद्यालय सुरू झाल्यानंतर ही कारवाई अधिक कडक करण्यात येणार असून, ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.
100 नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन
नाशिक पोलिसांनी महिला अत्याचार आणि वयोवृद्धांसाठी विशेष हेल्पलाईन सुरू केली होती. मात्र या हेल्पलाईनला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने हा नंबर बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आता नागरिकांना कुठलीही अडचण आल्यास त्यांनी 100 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.