नाशिक - शहरवासीयांची तहान भागवणाऱ्या मुकणे धरणात अवैद्य मासेमारीसाठी विषारी औषधांचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे.
नाशिक शहराला मुकणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. तसेच या धरणात शासनाकडून परवानगी घेऊन काही लोक मत्स्य व्यवसाय करतात. काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी या धरणातील मासे मारण्यासाठी पाण्यात कीटकनाशक टाकले जात आहे. त्यामुळे मृत होऊन पाण्यावर तरंगणारे मासे पळविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. हा प्रकार मुंबईच्या काही टोळ्या, स्थानिक टवाळखोरांच्या मदतीने करत असल्याची माहिती समजते. दरम्यान विषारी औषध टाकल्याने धरणातील पाणी दुषित झाले असून या धरणातील पाणी पिऊन जनावरेही दगावल्या घटना घडल्या आहेत.
पोलिसांनी या भागात अवैधपणे मासेमारी करण्यासाठी औषध फवारणी करणाऱ्या काही टवाळखोरांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने, रंगेहात पकडले आहे. मात्र या टवाळखोरांना ही तस्करी करण्याचे काम देणारे म्होरके मात्र पोलिसांना शोधता आलेले नाहीत. पोलिसांनी या प्रकरणी जलसंपदा आणि पालिका प्रशासनाला पत्र व्यवहार करत धरणाच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत.
या घटनेनंतर पालिकेने धरणातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहे. दरम्यान या सर्व प्रकाराने नाशिकरांच्या जीविताशी सुरु असलेला हा खेळ कोण थांबवणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा - खासदार भारती पवारांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, नाशिकसाठी वेगळ्या पॅकेजची मागणी
हेही वाचा - द्राक्ष उत्पादकांचे पैसे निर्यातदारांनी त्वरित द्यावेत; अन्यथा आंदोलन करु.. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा