नाशिक PM Modi in Nashik : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवावी आणि काशीप्रमाणे नाशिकचा कायापालट करावा, असं साकडं साधू- महंत मोदींना घालणार आहेत. साधू महतांच्या विनंतीचा मान राखत मोदी नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवणार का? अशी चर्चा सध्या नाशिकमध्ये सुरू आहे.
मोदींनी काशीचा कायापालट केला : नाशिकमध्ये होत असलेल्या राष्ट्रीय युवा अभियानाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक शहरात दाखल होणार आहेत. यावेळी त्यांचा रोड शो होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. यामुळं नाशिकमधील भाजपाविरोधी वातावरण दूर होण्याची अपेक्षा भाजपा नेत्यांना आहे. तसंच नाशिकही आध्यत्मिक नगरी असून मोदींनी काशीचा कायापालट करुन जागतिक पर्यटनाच्या यादीत भक्कम स्थान मिळवून दिलंय. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आगामी लोकसभा निवडणूक नाशिकमधूनच लढवावी, अशी विनंती साधू महंत मोदींना करणार असल्याचं महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी म्हटलंय.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीप्रमाणं नाशिक तीर्थक्षेत्रमधून लोकसभा निवडणूक लढवली, तर हा महाराष्ट्रासाठी सुवर्णकाळ ठरेल. यामुळं रखडलेली कामं मार्गी लागतील आणि नाशिकचा मंत्रभूमी ते यंत्रभूमी हा प्रवास खऱ्या अर्थानं पूर्ण होईल. - महंत अनिकेत शास्त्री देशपांडे
नाशिकचा कायापालट होईल : प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिकमध्ये दरवर्षी लाखो पर्यटक भेटी देत असतात. तसंच दर बारा वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळा होत असतो. या काळात देशभरातून हजारो साधू महंत तसंच करोडो नागरिक येत असतात. त्यामुळं प्राचिन व धार्मिक नाशिकचा कायापालट करण्यासाठी मोदींनी लोकसभा निवडणूक नाशिकमधूनच लढवावी, अशी मागणी मोदींकडे करणार असल्याचं महंतांनी स्पष्ट केलंय. मोदींच्या या दौऱ्यात ते रोड शो केल्यानंतर श्री काळाराम मंदिरात जाऊन रामरक्षाचं पठण करणार आहेत. तसंच गोदा पूजन करुन आरती करणार आहेत.
हेही वाचा :