नाशिक - पिंपळगाव बसवंत शहरातील मुख्य रस्त्यावर दोन मस्तवाल वळु एकमेकांना भिडले. सुरुवातीचा काही काळ मनोरंजन म्हणून नागरिकानी या वळूंची झुंज कुतुहलाने पाहिली. मात्र, ते दोन्ही वळू चांगलेच आक्रमक झाले आणि बघ्यांना घाम फुटायला सुरुवात झाली. त्यामुळे हे आक्रमक झालेले वळू काही नुकसान करण्याआधीच नागरिकांनी तत्काळ याची माहिती अग्निशामक दलाला दिली.
वळुंच्या झुंजीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी वळूंची झुंज आक्रमक झाली होती. त्या मस्तवाल वळुंना शांत करण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवांनांनी पाण्याचे फवारे मारायला सुरुवात केली. तब्बल अर्धा तास पाण्याची फवारणी केल्यानंतर वळूंची झुंज शांत करण्यास अग्निशामक दलाला यश आले. या झुंजीमुळे सुमारे दीड तास नागरिक रस्त्यावरून जाताना दुरूनच पळ काढत होते.
पिंपळगाव बाजार पेठेकडे जाण्याचा हा मुख्य रस्ता असल्याने बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सुरुवातीला काही काळ ही लढाई नागरिकांना मनोरंजन वाटत होती. मात्र, वळूनी आक्रमक रूप धारण केल्यानंतर नागरिक रस्त्यावरून पळ काढत होते.