नाशिक- मालेगावातील पश्चिम भागासह ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. शहरातील वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी प्रशासनासह सर्व नागरिकांनी सतर्क राहून आरोग्य प्रशासनाचे नियम पाळावेत. आरोग्य प्रशासनाने दिलेले नियम न पाळल्यास व रुग्णसंख्या वाढल्यास शहरातील पश्चिम भागासह ग्रामीण भागातील वडेल व झोडगे भागात दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी काल (8 ऑगस्ट) दिला.
मालेगाव शहरासह वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या अनुषंगाने काल शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी मंत्री भुसे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मालेगावातील वाढत्या रुग्णसंख्येमध्ये बहुतांश रुग्ण हे शहरातील पश्चिम भागासह ग्रामीण भागातील आहेत. त्यांच्यासाठी एम.एस.जी. कॉलेजमधील कोविड सेंटर कार्यान्वित ठेवण्यात यावे. अॅन्टीबायोटीक औषधांचा तुटवडा भासणार नाही यासाठी महापालिकेने तात्काळ उपाययोजना कराव्यात. रुग्णांना गृहविलगीकरणाची मुभा देताना त्यांनी आरोग्य प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले.
मानवतावादी दृष्टीकोनातून कुठल्याही रुग्णावर उपचार झालाच पाहिजे. यात शहरी, ग्रामीण रुग्णांवर उपचार करणे ही आपली जबाबदारी आहे. महानगरपालिकेला उपलब्ध करून दिलेल्या निधीतून तात्काळ औषधी उपलब्ध करून द्यावी. यासाठी लागणारा पुरेसा निधी उपलब्ध करून दिला असून आवश्यकता भासल्यास निधी उपलब्ध करून दिला जाईल. उपचाराशिवाय एकही रुग्ण वंचित राहता कामा नये, असे निर्देशही त्यांनी दिले. त्याचबरोबर शहरातील रस्त्यालगत असलेल्या विक्रेत्यांनी विशेष काळजी घेवून दिलेल्या सूचनांचे पालन करावे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नियमीत मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हातांचे निर्जंतुकीकरण करण्याचे, आवाहनही भुसे यांनी केले.
बैठकीत घटना व्यवस्थापक तथा अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, तालुका आरोग्य अधिकारी शैलेश निकम यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा- खासगी रुग्णालयांच्या लुटमारी विरोधात 'प्रहार'चे तिरडी आंदोलन