नाशिक - येथील महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपाययोजना वादात असताना, आता घरात डेंग्यूचे उत्पत्तिस्थान आढळल्यास नागरिकांनी दोनशे तर व्यावसायिक इमारती, सरकारी कार्यालये आणि बांधकामाच्या ठिकाणी डेंग्युच्या अळ्या आढळल्यास संबंधितांना थेट पाच हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने घेतला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात शहराला डेंग्युची समस्या चांगलीच भेडसावत असावते. 2017 या वर्षात 949 नागरिकांना डेंग्यूची लागण झाली होती. 2018 मध्ये हाच आकडा 884 पर्यंत गेल्यामुळे महापालिकेची झोप उडाली होती. यंदा डेंग्यूची तीव्रता सध्या तरी कमी असून आतापर्यंत दहा लोकांना डेंग्यूची लागण झाली आहे. मात्र, महानगरपालिकेने खबरदारी म्हणून आधीच उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे.
गेल्यावर्षी घरात डेंग्यूची उत्पत्तीस्थळे आढळली तर नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीवर ठेवला होता. मात्र, पालिकेच्या उपाय योजना कागदावर आणि नागरिकांवर दंडाची संक्रात का? असा प्रश्न उपस्थित करत प्रस्ताव फेटाळला होता. परंतु, आरोग्य व वैद्यकीय सभापती सतीश कुलकर्णी यांनी हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर कालांतराने त्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. त्याचाच एक भाग म्हणून यंदा देखील डेंग्यु डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळल्यास घर अथवा जागा मालकांवर दंडात्मक कारवाईची अंमलबजावणी सुरू झाली आहे.