नाशिक - मालेगाव तालुक्यातील कक्राळे गावा लगतच्या वनहद्दीत राष्ट्रीय पक्षी मोरांची शिकार करून पोबारा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या 5 जणांना स्थानिक नागरिकांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. त्यांना चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या आरोपींकडून 1 बंदूक, 22 जिवंत काडतुसे, चाकू व इंडिगो कार ताब्यात घेतली आहे.
हेही वाचा - कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सप्तश्रृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दी
मालेगाव तालुक्यातील कंक्राळे गावा लगतच्या जंगलात सकाळी साडेनऊच्या सुमारास काही अज्ञात लोक मोरांची शिकार करत असल्याचे एका स्थानिक नागरिकाच्या निदर्शनास आले. त्यावेळी त्या व्यक्तीने गावात जाऊन ही माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी एकत्र येऊन नाकाबंदी करून संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा इंडिगो (एमएच-41-व्ही-8690) या वाहनाने संशयितांनी करजगव्हाण गावाकडे पळून जाण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी तातडीने पुढील गावात भ्रमरध्वनीवरून ही माहिती दिली. त्याप्रमाणे काही शेतकऱ्यांनी रस्त्यावर ट्रॅक्टर व बैलगाडी आडवी घातली. मात्र, संशयितांनी पुन्हा चकवा देत हताणे गावाच्या दिशेने पळ काढला.
हेही वाचा - नाशकातील तरुणाचा प्रचारासाठी अनोखा फंडा; 'स्पेशल बाईक'वरून करतोय प्रचार
दरम्यान, नागरिकांनी वडणेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात माहिती दिली असता, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, पोलीस हवालदार ए.एस.सुर्यवंशी, राजू विटोकर, अशोक व्यापारे, बादल साळुंखे व गणेश जाधव यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. संशयित शिकारी करजगव्हाण शिवारातील छोट्या वाटेने वाहनातून पळ काढत असताना आरोपी जुबेरखान नासिरखान (वय 40, रा. राजानगर, मालेगाव), आरीफ मोहम्मद युनूस (वय 45, रा.हूसेनसेठ कंपाऊड मालेगाव), सुफीयान अहमद सलीम अहमद (वय 33, रा.इस्लामपुरा गल्ली मालेगाव), सिववान अहमद अनिस अहमद (वय 38, रा. नयापुरा मालेगाव) व मोहम्मद स्वालेह मोहम्मद इसाक (वय 68, नयापुरा मालेगाव) या 5 जणांना नागरिक आणि पोलिसांनी ताब्यात घेतले.
हेही वाचा - मनसे अन् राष्ट्रवादीचं ठरलं? नाशिकमध्ये चर्चेला उधाण
या संदर्भात पोलिसांनी मालेगाव येथील वनविभागाच्या कार्यालयात माहिती दिली. संशयितांना वडणेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. कायदेशीर कारवाई करून आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी मुद्देमालासह वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.