नाशिक - वीरमरण आलेल्या जवानाला किंवा देशातील विशिष्ट पदावर असलेल्या व्यक्तीला तिरंग्यात गुंडाळून निरोप देण्याची परंपरा आजपर्यंत पाहण्यात आलेली आहे. मात्र, देशाचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरालासुद्धा अशाच प्रकारे निरोप देण्यात आला आहे. नाशिकच्या पिंपळगाव बसवंत परिसरात विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडलेल्या मोरावर वन विभागाने शासकीय इतमामात अंत्यसंस्कर केले. मोर राष्ट्रीय पक्षी असल्याने त्याला तिरंगा ध्वज गुंडाळून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पावसाची चाहूल लागली की, पिसारा फुलवून नाचणारा मोर भल्या-भल्यांना आपल्या रंगीबेरंगी पिसारा आणि अलौकिक सौंदर्याने भुरळ घालतो. म्हणूनच मोराला भारताच्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र, जेव्हा मोराचा मृत्यू होतो तेव्हा त्याला एखाद्या शहीद जवान अथवा विशिष्ट पद असलेल्या व्यक्तीप्रमाणे अखेरचा निरोप देण्यात येतो. हे फार कमी लोकांना माहिती आहे. अशाच एका मोराचा विजेच्या तारेचा धक्का लागून मृत्यू झाल्यानं त्याला पारंपरिक पद्धतीने निरोप देण्यात आला आहे. पावसाची चाहूल लागताच मोर आपला पिसारा फुलवून नृत्य करायला लागतात. मात्र, अशाच एका मोराचा नाचत असताना विजेच्या तारेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला.
नाशिकच्या पिपंळगाव बसवंतमध्ये असलेल्या शासकीय रोपवाटिकेतील प्रसन्न वातावरणात एक मोर पिसारा फुलवत नाचत होता. मात्र, डोळ्याचे पारणे फेडणारे हे दृश्य फार काळ टिकले नाही. शिवाय या मनाला भुरळ घालणाऱ्या प्रसंगाचा शेवटही वेदनादायी झाला. सकाळी-सकाळी पावसाची चाहूल लागल्यानं स्वच्छंदपणे नाचणाऱ्या मोराच्या पिसाऱ्याचा स्पर्श जवळ असलेल्या विजेच्या तारेला झाल्याचे जवळून जात असलेल्या पशुपक्षीप्रेमी बाळासाहेब आंबेकर आणि स्वप्नील देवरे यांना निदर्शनास आले. त्यांनी मोराला तातडीने पिंपळगाव पशुवैधकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मोराला मृत घोषित केले. त्याचे शवविच्छेदन करून मोराचे शव वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, मोराला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असल्यानं या मृत मोराला तिरंग्यात गुंडाळून त्याच्यावर पिंपळगावच्या शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले. कोणत्याही ठिकाणी वन्यजीवांबाबतीत अनुचित अथवा अनपेक्षित प्रकार निदर्शनास आल्यास वनविभागाला तातडीने कळवावे, असे आवाहन चांदवड वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले.
एखादा हुतात्मा जवान अथवा उच्चपदस्थ व्यक्तीप्रमाणे या मोरावर पारंपारिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.अशाप्रकारे विजेच्या धक्क्याने मोराचा मृत्यू झाल्यानं वनविभागाने या विजेच्या तारांचा लवकरात लवकर बंदोबस्त करायची गरज आहे. यावेळी वनविभागाचे अधिकारी सहाय्यक वनरक्षक सुजित नेवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी देविदास चौधरी सुनील महाले, अण्णा टेकनर, वाल्मिक निरभवणे आदी उपस्थित होते.