नाशिक - आज दुपारी 2 वाजता शहरातील मद्य विक्रीची दुकाने सुरू झाली. मात्र, तळीरामांचा अतिउत्साह नडल्याने अवघ्या दोन तासात पोलिसांनी शहरातील दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळले गेले नाही म्हणून मद्यविक्री चालकांवर 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून संपूर्ण देशात टाळेबंदी करण्यात आली आहे. सरकारने देशातील अर्थकारण सुरू व्हावे, यासाठी देशातील अनेक उद्योगधंदे सुरु करण्याचा निर्णय घेतला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत मद्यविक्री सुरू करण्याचाही निर्णय सरकारने घेतला. मात्र, नाशिकमध्ये मद्य खरेदीसाठी आलेल्या सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.
शहरातील सर्वच मद्य विक्री दुकानांवर तळीरामांनी मोठी गर्दी केल्याने गोंधळ उडाल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी पोलिसांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या तळीरामांना काठीचा प्रसाद दिला. मात्र, तरीही मद्यविक्रीच्या दुकानांच्या बाहेरील गर्दी कमी होत नसल्याने अखेर पोलीस आयुक्तांनी शहरातील दुकाने दोन तासात बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच सोशल डिस्टन्सिंग पालन न करणाऱ्या अनेक मद्यविक्री दुकान मालकांवर कलम 188 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच पुढील आदेश येईपर्यंत दुकाने बंद ठेवण्याची ताकीदही देण्यात आली आहे.
हेही वाचा - तळीरामांचा बांध फुटला... नाशकात मद्यप्रेमींनी फिजिकल डिस्टन्सिंगचा उडवला फज्जा