मनमाड (नाशिक) - मनमाडसह नाशिक ग्रामीणमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले असून आता दुकाने, बाजार पेठ रात्री 8 वाजेपर्यंत उघडी राहणार आहेत. मात्र, श्रावण महिन्यातदेखील मंदिरे बंद असल्याने भाविकांचा हिरमोड झाला आहे. अनेक भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती. मात्र मंदिर बंद असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त करत मंदिरे खुली करण्याची मागणी केली आहे.
मंदिर बंद असल्याने भाविकांची नाराजी -
कोरोना आटोक्यात येत असल्यामुळे मनमाड, मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे आता दुकाने, बाजारपेठा आता सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने दुकानदार, व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकीकडे बाजारपेठ खुली झाली असली, तरी दुसरीकडे मात्र धार्मिक स्थळे अद्यापही बंद आहेत. दरम्यान, आजपासून श्रावण सुरू झाला असून मंदिरे बंद असल्याने भाविकांचा हिरमोड होत आहे. मनमाडपासून जवळ नागापूरच्या प्राचीन नागेश्वर महादेव मंदिरात तसेच अंकाई किल्ला येथे देखील अगस्तीमुनींचे मंदिर आहे. या ठिकाणीदेखील श्रावण महिन्यात यात्रा भरते. मात्र, शासनाने मंदिर बंद ठेवल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
लसीकरण वाढवण्याची गरज -
ज्यांचे लसीकरण झाले आहे, त्यांना लोकल ट्रेनसह इतर ठिकाणी सुविधा उपलब्ध करून नियमात शिथिलता दिली आहे. अशाच प्रकारे ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, त्यांना मंदिरे खुली करून द्यावी, यासाठी लसीकरण वाढवण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रियाही अनेक भाविकांनी दिली.
हेही वाचा - Shravan Monday: त्र्यंबकेश्वर महादेव मंदिराचे दार सलग दुसऱ्यावर्षी भाविकांसाठी बंदच, पोलीस बंदोबस्त तैनात