नाशिक - उन्हाची दाहकता वाढली असून ग्रामीण भागात पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 24 धरणांमध्ये 54 टक्के जलसाठा आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्या गंगापूर धरणात 50 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. एप्रिल व मे हे दोन महिने काढायचे असल्याने काटकसरीने पाणी वापरावे लागणार आहे.
ग्रामीण भागात पाणी टंचाईला सुरुवात
मार्च अखेरपासून उन्हाची तीव्रता वाढली असून पुढील दोन महिने तापमानाचा आलेख चढता राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ग्रामीण भागात अद्याप टँकर जरी सुरू नसले तरी पाणी टंचाई सुरू झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील धरणात 54 टक्के जलसाठा आहे. गतवर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने जवळपास सर्वच धरणे तुडूंब भरुन वाहत झाली होती. त्यामुळे मार्च अखेर उजाडला तरी धरणांमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक जलसाठा शिल्लक आहे. मात्र, गतवर्षीच्या हा साठा 60 टक्के इतका होता.
उपलब्ध जलसाठ्याचे काटकसरीने नियोजन करावे लागणार
येत्या काळात उन्हाची दाहकता वाढणार असल्याने पाण्याच्या वापरात व मागणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. अनेक धरणांतून पिण्यासाठी आवर्तन सोडावे लागणार आहे. तसेच शेती व उद्योगांसाठी ठरलेल्या नियोजनानूसार आवर्तन सोडावे लागणार आहे. त्यामुळे धरणातील जलसाठ्यात झपाट्याने घट होणार आहे. ते पाहता जिल्हाप्रशासनासमोर उपलब्ध जलसाठ्याचे काटकसरीने नियोजन करावे लागणार आहे.
हेही वाचा - नाशिकमध्ये हॉटेल ज्युपिटरवर मनपा आणि पोलिसांची धडक कारवाई