नाशिक - उत्तर महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा अतितीव्र झाल्या आहेत. त्यात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व अहमदनगर या ५ जिल्ह्यात अवघा १६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे जूनच्या सुरुवातीस पाऊस न पडल्यास भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे.
उत्तर महाराष्ट्रात दुष्काळाची तीव्रता प्रचंड वाढली असून, धरणामधील पाणीसाठा घटला आहे. तसेच जलस्रोतही कोरडे पडले असून, विभागात केवळ १६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्वात कमी ६.३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्याच्या खालोखाल जळगावमध्ये १२ टक्के, नाशिकमध्ये १४.३० टक्के, धुळे जिल्ह्यात १६.५० टक्के तर नंदूरबारमध्ये २७.१० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या भूजल तपासणी सर्वेक्षणाच्या अहवालानुसार विभागातील ५४ पैकी ४४ तालुक्यातील ८९५ गावे टंचाईग्रस्त घोषीत झाली आहेत. ४१ तालुक्यातील भूजल पातळीत १ ते २ मीटरने तर ७ तालुक्यातील पातळी २ ते ३ मीटरने घट झाली आहे. दरम्यान, जूनच्या पहिल्या २ आठवड्यात पाऊस न पडल्यास भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे.
नाशिक जिल्ह्यात दिंडोरी, देवळा, त्र्यंबक नाशिक (०-१ मीटर), इगतपुरी, चांदवड, पेठ, सुरगाणा, कळवण येवला (१-२) नादगाव, सटाणा, सिन्नर, मालेगाव (२-३) याठिकाणी तर धुळे जिल्ह्यात शिंदखेडा, शिरपूर (१ व २ मीटर) धुळे, साक्री (२ ते ३ मीटर) येथे भुजल पातळीत घट झाली आहे.
त्याखालोखाल नंदुरबार जिल्ह्यात नवापूर, शहादा, नंदुरबार, अक्कलकुवा (०-१) मीटर व जळगाव जिल्ह्यात रावेर, भडगाव, पाचोरा, जामनेर, पारोळा, एरंडोल, बोदवड, जळगाव, भुसावळ (१-२ मीटर), मुक्ताईनगर (२-३), यावल (३मीटर) तसेच अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव, कोपरगाव, राहता, पारनेर (०-१ मीटर), श्रीगोंदा, संगमनेर, जामखेड, कर्जत, राहुरी(१-२ मीटर), पाथर्डी (२-३मीटर) येथे भुजल पातळीत घट झाली आहे.