येवला (नाशिक) - येवल्यात कांदा व्यापाऱ्याच्या मारहाणीच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी पुणे-इंदौर मार्गावर येवला बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले. अक्षय गुडघे असे मारहाण झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
रोख पैसे मागितल्याने व्यापाऱ्याची शेतकऱ्याला मारहाण
कांदा विकल्यानंतर अक्षय गुडघेने व्यापाऱ्याकडे रोख पैसे मागितले. मात्र, व्यापाऱ्याने रोख पैसे देण्यास नकार दिला. यावरून अक्षय आणि व्यापाऱ्यात बाचाबाची झाली. अखेर व्यापाऱ्याने अक्षयला मारहाण केली. शिवाय, त्याचा मोबाईलही फोडण्याचा प्रयत्न केला. कारण, मोबाईलमध्ये मारहाणीचा व्हिडिओ होता. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त शेतकऱ्यांनी मारहाणीच्या निषेधार्थ पुणे-इंदौर महामार्गावर धाव घेऊन येवल्यातील बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले.
पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र जोपर्यंत मारहाण करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. अखेर घटनेची चौकशी करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आणि अर्ध्या तासानंतर रास्ता आंदोलन मागे घेण्यात आला.
हेही वाचा - राष्ट्रवादी आरक्षणाच्या मुळावर, आघाडीतील ओबीसी नेते बोलघेवडे - पडळकर