नाशिक - कांद्याच्या दराने घेतलेली उसळी आज ही कायम होती. उमराणे बाजार समितीत तर आज कांद्याला तब्बल १३९०० इतका रेकॉर्ड ब्रेक भाव मिळाला. लासलगाव, मनमाड यासह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांतदेखील कांद्याला विक्रमी भाव मिळाला आहे. एकीकडे कांद्याच्या भावात मोठी वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यात पाणी येत आहे तर दुसरीकडे मात्र परतीच्या पावसाने कांदा पिक उध्वस्त केल्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून भावात मोठी वाढ होऊन देखील शेतकऱ्यांच्या पदरात काही पडत नसल्याचे चित्र आहे
कांदा हे नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पिक आहे. कांद्याने अनेकदा शेतकऱ्यांना तारले आहे. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे मागील दोन वर्षांपासून कांदा शेतकऱ्यांना रडवत आहे. मागील वर्षी दुष्काळ आणि यंदा अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी पुरता हैराण झालेला आहे. यावेळी तर उत्पादन खर्चदेखील निघत नसून एकरी 35 ते 40 हजार खर्च करून उत्पादन हातात फक्त 1 किंवा 2 कॅरेट उत्पन्न येत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांना पुन्हा सावकराचे कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही, अशी अवस्था आहे.
दरम्यान, नवीन कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येईपर्यंत कांद्याचे भाव कमी होणार नाही. नवीन कांदा हा साधारण महिनाभरात बाजारात येईल. त्यांनंतर थोडेफार भाव कमी होतील. मात्र, शेतकरी वर्तमान भावांत देखील सुखी नसल्याचे चित्र आहे. उत्पादनच नाही मग भाव 200 रुपये प्रतिकिलोपर्यंत गेला तरी काही उपयोगाचा नाही, असे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.