नाशिक - श्रीलंकेने दिवाळखोरी घोषित केल्याने त्याचा लासलगाव बाजार समितीतून ( Lasalgaon Market Committee ) होणार्या कांदा निर्यातीला मोठा फटका ( Big Impact On Onion exports ) बसला आहे. लासलगावहून श्रीलंकेला ( bankruptcy Sri Lanka ) आठवड्याला 200 ते 250 कंटेनर कांदा पाठवला जातो. दिवाळखोरीमुळे हे प्रमाण आता 25 कंटेनरवर आले असून दरही 30 वरुन 10 ते 15 रुपये किलोपर्यंत घसरले आहे. त्यामुळे कांदा निर्यातदार व्यापारी ( Onion exporter traders Lasalgaon ) व उत्पादक शेतकरी संकटात आले आहे.
दर कोसळण्याची भिती : लासलगावमधून बांग्लादेश व श्रीलंकेला कांदा पाठवला जातो. बांग्लादेशनंतर श्रीलंका दुसरा सर्वात मोठा कांदा आयातदार देश आहे. आठवड्याला लासलगावमधून २०० ते २५० कंटेनर कांदा मुंबईमार्गे श्रीलंकेला निर्यात केला जातो. परंतु युक्रेन - रशिया युध्दामुळे कांदा निर्यातीवर परिणाम झाला असताना श्रीलंका दिवाळखोर झाल्याने कांदा व्यापारी व उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. श्रीलंकेकडे माल घेण्यासाठी व पैसे अदा करण्यासाठी डाॅलरच नसल्याने भारतातून होणारी निर्यात घटली आहे. सद्यस्थितीत 20 ते 25 कंटेनर कांदा श्रीलंकेला पाठवला जात आहे. तब्बल 150 कंटेनरची घट झाली असून हा कांदा देशाअंतर्गत बाजारपेठेतच विकावा लागणार आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत आवक जादा होण्याची चिन्हे असून दर कोसळण्याची भिती आहे.
कांदा निर्यातदारांचे कोट्यवधी रुपये श्रीलंकेत अडकले : भारत सरकारने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा, यासाठी आता निर्यातदार एकत्र आले असून त्यांनी वेगवेगळ्या मागण्या करत सरकारसोबत पत्रव्यवहार करण्यासाठी सुरुवात केली आहे. निर्यातदारांवर निर्बंध लावलेले आहेत ते काढावे जेणेकरून भारतातील व्यापार मोठा होईल. जर अशीच स्थिती राहिली तर कांद्याचे भाव आणखी पडतील आणि याचा फटका हा शेतकऱ्यांना बसेल, अशी भावना कांदा निर्यातदारांनी व्यक्त केली आहे. दरम्यान निर्यात बंद असले तरी निर्यातदारांचे कोट्यवधी रुपये हे श्रीलंकेत अडकले असून आता ते परत मिळविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. कांदा निर्यातदारांप्रमाणेच शेतकऱ्यांना देखील याचा फटका बसला आहे. सध्या कांदा हा ९०० रुपये क्विंटलने विकला जात असल्याने शेतकऱ्यांना याची झळ सोसावी लागत आहे. एकरीप्रमाणे कांद्याचे उत्पादन घेताना साधारण ५० हजार खर्च कांदा लागवडीसाठी लागतो. परंतु त्यामानाने उत्पन्न हे अगदी कमी येत असल्याने शेतकऱ्यांनी आता करायचे काय? असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत. तर सरकारने निर्यातदारांना योग्य ती मदत करावी, अशी अपेक्षा कांदा निर्यातदार करत आहे.
हेही वाचा - कलयुगातील श्रावणबाळ.. 71 वर्षीय मुलाने 105 वर्षीय आईला खांद्यावर बसवून घडवले साईदर्शन