नाशिक - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अनिल लक्ष्मण निकम (रा. ४९, रा. मेरी लिंक रोड) यास 80 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. नाशिकच्या पंचवटी कारंजा येथे आज (मंगळवार) दुपारी ही कारवाई करण्यात आली.
अनिल निकम हे कनिष्ठ आरेखण नगर रचनाकार, विकास योजना विशेष घटक भूमी अभिलेख विभागात काम करतात. काही दिवसांपूर्वी तक्रारदाराने पेट्रोल पंप जागा एन ए (बिगर शेती) होण्यासाठी त्या जागेची फाईल नगररचनाकार विभागात सादर केली होती. फाईल मंजुर होत नाही म्हणून तक्रारदाराने विभागात जाऊन चौकशी केली. तेव्हा निकम यांनी तक्रारदाराकडे 80 हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
तक्रारदाराच्या तक्रारीवरून आज लाचलुचपत विभागाने नाशिकच्या पंचवटी कारंजा येथे पंच साक्षीदारांसमवेत 80 हजार रुपयाची लाच घेताना निकम यांना अटक केली. मात्र, अटक केल्यानंतर तब्येत बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती लाचलुचपत विभागाने दिली.