नाशिक - जिल्ह्यातील गोदावरी नदी काठावर शनिवारी उत्तर भारतीय भाविकांचा छटपूजेचा सण मोठ्या भक्तीभावात पार पडला. यावेळी पाण्यात उभे राहून महिलांनी मावळत्या सूर्याला नैवेद्य दाखवत अर्घ्य दिला.
उत्तर भारतात महत्त्वाचा समजला जाणारा तसेच दिवाळीच्या सहाव्या दिवशी येणारा सण म्हणजे छटपूजा. या निमित्त शनिवारी नाशिकच्या गोदाघाट परिसरात उत्तर भारतीय नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गजानन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे या ठिकाणी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच रामकुंड भागातही संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा - नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटींची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा
देशातील प्रत्येक भागात उत्तर भारतीय कामानिमित्त स्थायिक झाले आहेत. मात्र ते सोबत आपली परंपरा जपत आहे. छटपूजा उत्तर भारतीयांचा महत्त्वाचा सण आहे. उत्तर भारतात हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी उत्तर भारतीयांनी एकत्र येऊन हा सण साजरा केला. या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी घरातील महिला तीन दिवस देवीचे उपवास करतात. शेवटच्या दिवशी संध्याकाळी नदी,समुद्र,तलाव,घाट इत्यादी ठिकाणी पाण्यात उतरून मावळत्या सूर्याला आणि सकाळी पुन्हा उगवत्या सूर्याला उभे राहून अर्घ्यही अर्पण केला जातो. तसेच शेतातील नवीन पीक, भाजी, फळे, कंदमुळे, ऊस घरी बनवलेला प्रसाद सूर्याला अर्पण करून, तीन दिवसांचा उपवास सोडला जातो.