नाशिक - शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, ज्या कोरोनाबाधित रुग्णांना लक्षणं नाही, अशा रुग्णांना शासनाने काही अटींवर घरात राहण्याची मुभा दिली आहे. मात्र, अशा होम क्वारंटाईन असलेल्यांच्या घरातून येणाऱ्या कचऱ्याचे विलगीकरण होत नसल्याने घंटागाडी कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मुंबई, पुणे पाठोपाठ नाशिक जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असून आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात 25 हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून, 700 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच शहरात 1 हजार 675 प्रतिबंधित क्षेत्र असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले 36 हजार हाय रिस्क नागरिक नाशिक शहरात आहेत. ज्या कोरोनाबाधितांना कोरोनाचे सौम्य लक्षणं किंवा लक्षणे नाहीत, अशांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. अशा रुग्णांना आपले वापरलेले मास्क, सॅनिटायझरची बाटली यांची विल्हेवाट लावण्यापूर्वी ते तीन दिवस एका कागदामध्ये बांधून ठेवणे बंधनकारक आहे. तसेच जर होम क्वारंटाईन रुग्णाच्या घरातील कचरा असेल तर त्याची माहिती घंटागाडी कर्मचाऱ्यांना देणे गरजेचे आहे. ज्यामुळे तो कचरा वेगळा ठेवण्यात येईल. मात्र, असे असतानाही अनेकांकडून या नियमाला फाटा देत कचरा थेट घंटागाडीत टाकतात. यामुळे घंटागाडी कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात आहे.
घंटागाडी कर्मचाऱ्यांना सूचना
नाशिक शहरात सर्व घंटागाडी कर्मचाऱ्यांना मास्क, हॅण्ड ग्लोव्ह्ज् वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती महापालिकेचे नोडल अधिकारी डॉ. आवेश पलोड यांनी दिली. सर्व कर्मचारी मास्क वापरत असले तरी काही कर्मचारी हे हॅण्ड ग्लोव्हजचा वापर करत नसल्याचे दिसून येत आहे.
सुरक्षा रक्षकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद नाही
एखाद्या अपार्टमेंटमध्ये जर होम क्वारंटाइन असलेला कोरोनाग्रस्त रुग्ण असेल तर त्यांनी दिलेल्या कचऱ्याबाबत सुरक्षा रक्षकांनी घंटागाडी कर्मचाऱ्यांना देणे गरजेचे आहे. मात्र, अनेक ठिकाणी याबाबत कोणतीच माहिती सुरक्षा रक्षक देत नसल्याचे घंटागाडी कर्मचाऱ्यांनी सांगितले.