नाशिक - पुढील मुख्यमंत्री हा भाजपचाच असणार असे वक्तव्य भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी सोमवारी नाशिकमध्ये केले होते. त्यानंतर शिवसैनिकांनी सरोज पांडे यांच्या वक्तव्याविरोधात भाजप कार्यालयाबाहेर मुख्यमंत्री शिवसेनेचाच या आशयाचे होर्डिंग लावत पांडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. दरम्यान, या होर्डिंग प्रकरणामुळे शिवसेना-भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.
मुख्यमंत्री पदाबाबत पक्षश्रेष्ठींमध्ये फार्म्युला ठरलेला असताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून मात्र या वादाला वारंवार खतपाणी घातले जात असल्याचे वारंवार समोर येत आहे. सोमवारी नाशिकमध्ये भाजपच्या प्रदेश प्रभारी सरोज पांडे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असा दावा करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.
सरोज पांडे यांचे हे वक्तव्य येताच नाशिकमधील शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी थेट भाजपच्या नाशिकमधील कार्यालयाबाहेर मुख्यमंत्री शिवसेनेचाच, अशा आशयाचे होर्डिग लावत भाजपला आव्हानच दिले आहे. शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामने यांनी हे होर्डिग लावत, पक्षश्रेष्ठींचा निर्णय झालेला असताना चमच्यांनी मध्येमध्ये लुडबुड करू नये, असा टोला सरोज पांडे यांच्या वक्तव्यावर लगावला आहे.
दरम्यान, नाशिक शहर भाजप कार्यालयाबाहेर लावण्यात आलेले होर्डिंग पोलिसांनी काही तासातच त्याठिकाणाहून हटवले आहे. शिवसेना भाजपमधील मुख्यमंत्री कुणाचा याहून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. यापूर्वी भाजपसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री कुणाचा यावर जाहीर वाच्यता करण्याबाबत बंधन घालत आमचं ठरलंय, अशी प्रतिक्रिया देण्यात येत होती. मात्र, सोमवारी नाशिकमध्ये सरोज पांडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.