नाशिक - उत्तर प्रदेशमधील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांचा तसेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ शनिवारी नाशिकच्या पोस्ट ऑफिस कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने अदोलन करण्यात आले. यावेळी या घटनेचा निषेध करणारे शेकडो पत्र योगी आदित्यनाथ यांना पाठवण्यात आले आहेत.
चंद्रमुखी देवी यांच्या वक्तव्याचा निषेध
उत्तर प्रदेशमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मात्र याबाबत योगी आदित्यनाथ सरकार गंभीर नसल्याचा आरोप आंदोलक महिलांनी केला आहे. याविरोधात शनिवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने एन डी पटेल रोड वरील पोस्ट ऑफिस कार्यालयाच्या आवारात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी योगी आदित्यनाथ सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत, त्यांना पत्रे पाठवण्यात आली आहेत. याच बरोबर दोन दिवसांपूर्वी झालेल्या अंगणवाडी सेविकेवरील अत्याचार प्रकरणी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवी यांच्या फोटोला काळे फासून, त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधही करण्यात आला. तसेच त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आली.
मुख्यमंत्री शहरांची नावे बदलण्यात व्यस्थ
दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील बदायू या ठिकाणी एक पन्नास वर्षीय अंगणवाडी सेविका मंदिरात पूजेसाठी गेली असताना, मंदिरातील पुजाऱ्यासह तिघा जणांनी तिच्यावर बलात्कार करत, तिची निर्घुणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यानंतर उत्तर प्रदेशमधील स्त्री सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, याकडे लक्ष देण्याऐवजी मुख्यमंत्री शहरांची नाव बदलण्यात व्यस्त असल्याचा आरोपही यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी केला आहे.