नाशिक - जिल्ह्यात कोरोनाची वाईट परिस्थिती असून नाशिकला पीएम फंडातून चार ऑक्सिजन प्लांटसोबत रिलायन्सकडून २ ऑक्सिजन टँकर मिळतील, तसेच जिंदालकडूनही एक अतिरिक्त ऑक्सिजन टँकर देण्याची तयारी असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस यांनी नाशिक जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये जाऊन आढावा घेत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा - नाशिक जिल्ह्यातील 5 केंद्रांवर 18 वर्ष पूर्ण केलेल्यांना मिळणार लस..
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन आणि जयकुमार रावल यांनी नाशिक मधील वैद्यकीय सुविधांचा आढावा घेतला. त्यांनी रुग्णालयांमध्ये भेट देऊन विभागीय आयुक्तांशी चर्चा केली. नाशिकला रेमडेसिवीरचा पुरवठा अतिशय मर्यादित आहे. आमचा प्रयत्न आहे की तो कसा वाढेल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच, येत्या काही दिवसांत नाशिक जिल्ह्यासाठी पीएम फंडातून चार ऑक्सिजन प्लांटसोबत रिलायन्सकडून २ ऑक्सिजन टँकर मिळतील, तसेच जिंदालकडूनही एक अतिरिक्त ऑक्सिजन टँकर देण्याची तयारी असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
वजनदार नेते रेमडेसिवीर खेचून घेत आहेत
मंत्री आणि वजनदार नेते हे आपल्या भागात रेमडेसिवीरचा अधिक पुरवठा करून घेत आहेत. मात्र, हे आयोग्य असून मंत्री म्हणजे ते एका भागाचे नसून राज्याचे असतात. जिथे खरच गरज आहे तिथे रेमडेसिवीरचा पुरवठा झाला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. लसीबाबत राज्य सरकार वारंवार केंद्राकडे बोट दाखवते, ते न करता राज्य सरकारने योग्य नियोजन करावे. केंद्र सरकारने सिरम आणि भारत बायोटेकला लसीकरणासाठी पैसे दिले आहेत. प्रोडक्शन जसे हातात येईल तेव्हा वितरण होईल, असेही फडणवीस यांनी म्हटले.
हेही वाचा - व्यापाऱ्याला खंडणी मागणाऱ्या चार आरोपींच्या आवळल्या मुसक्या