नाशिक - महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीची मुख्य परीक्षा ऑनलाइन घेण्यास विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला आहे. स्पर्धा परीक्षा विश्वात महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीने आगामी वर्ग एक, दोन आणि तीनच्या मुख्य परीक्षा ऑनलाइन घेण्यासाठी पाऊल उचलले आहे. यासंदर्भात आयोगामार्फत निविदा देखील काढण्यात आल्या आहेत. मात्र ऑनलाइन स्वरूपात होणाऱ्या परीक्षा पद्धतीला विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला आहे.
राज्यात लाखोंच्या संख्येने विद्यार्थी एपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी खूप अभ्यास करत असतात. अशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच प्रस्तावित परीक्षा पुढे ढकल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या संदर्भात एमपीएससी कृती समितीने राज्य शासनाला निवेदन देत ऑनलाइन परीक्षेला विरोधात केला आहे.
विद्यार्थ्यांचा या ऑनलाइन परीक्षेला विरोध का आहे, याबाबत ईटीव्ही भारत ने विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
विद्यार्थ्यांचा ऑनलाइन परीक्षेला का आहे विरोध?
- ऑफलाइन प्रकारामध्ये विद्यार्थ्यांना कार्बन प्रत मिळत असल्याने त्यांच्याकडे पुरावा राहत होता.
- ऑनलाइन बाबत जर कार्बन प्रत मिळत नसेल तर आयोग म्हणतील ते मार्क स्वीकारावे लागतील.
- एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत 4 ते 5 लाख विद्यार्थी असतात. तरी आयोग ही परीक्षा ऑफलाइन प्रकारात घेणार आहे. मग मुख्य परीक्षेत 5 ते 10 हजार विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन परीक्षा का?
- परीक्षेच्या दरम्यान जर संगणकात तांत्रिक अडचण आली तर त्याबाबत आयोगाकडे कोणती उपाययोजना आहे का?
- मराठी आणि इंग्रजीची उत्तरे खूप मोठी असतात. संगणकावर ते उतारे सोडवताना अडचण येऊ शकते.
- आजपर्यंत विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षेच्या दृष्टीकोनातून प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेवर सराव केला आहे. तेव्हा ऑनलाइन परीक्षा देताना अडचणी येऊ शकतात.
- ऑनलाइन परीक्षेत घोटाळा होण्याची भीती.