नाशिक : जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात अवैधरित्या तलवारी बाळगणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी गजाआड केले आहे. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रभारी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम सुरू आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी पथकील अधिकारी यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार गस्त घालत असताना मयूर किसन बलक (21) या युवकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पान टपरी मध्ये लपवून ठेवलेल्या तब्बल 17 तलवारी हस्तगत करण्यात आल्या आहेत. परप्रांतीय मित्रांकडून या तलवारी शहरात विक्रीसाठी आणल्याची माहिती या तरुणाने पोलिसांना दिली. सुरवातीला झडती घेतली असता या युवकाने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सत्य माहिती दिली आहे.
ही शस्त्रे कोणाकडून आणली आणि कोणाला द्यायची होती याबाबत पोलीस पुढील तपास करत आहे. मयूर बलक याच्या विरोधात अवैधरित्या शस्त्रे बाळगल्या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : येवल्यात शिक्षिकेसह मुलीवर शेजाऱ्यांकडून प्राणघातक हल्ला