नाशिक - शहरात सध्या कोरोना नियंत्रणात असला तरी, परदेशात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर कोरोना प्रदुभाव वाढल्याचे चित्र आहे. हे लक्षात आल्यावर आता नाशिक महानगरपालिकेकडून दिवाळीनिमित्त बाजारपेठत होणारी गर्दी लक्षात घेत बाजरपेठेत 'नो मास्क, नो एन्ट्री' मोहीम राबवली जाणार आहे. विना मास्क बाजारपेठेत आढळल्यास नागरीकांना दंड ठोठावला जाणार आहे. तसेच ग्राहकांना विना मास्क दुकानात प्रवेश दिल्यास दुकानदारांवर कारवाई केली जाणार असल्याचे मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले आहे.
नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 6 एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. मात्र, जूनमध्ये परिस्थिती नियंत्रणात असतांना अनलॉकनंतर रुग्णसंख्या वाढत ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात कोरोनाची रुग्णसंख्या 50 हजार पार गेली. यात गणेशोत्सव काळात रुग्ण मोठ्या संख्येने वाढल्याचे दिसून आले. या काळात बाजारात खरेदी करतांना नागरिकांनी मास्क तसेच सोशल डिस्टन्सिंग नियम झुगारून गर्दी केल्याचे चित्र होते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात वाढला होता. याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महानगरपालिकेने कोरोनाबाबत कडक नियमावली तयार केली असून बाजारपेठेत विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. कोणीही नागरिक विनामास्क आढळल्यावर त्याला 200 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. हेच नियम दुकानदारांसाठी राहणार असून विनामास्क ग्राहकांना दुकानात प्रवेश दिल्यास दुकानदाराला दंड आकारण्यात येऊन पुन्हा नियम मोडल्यास दुकानाचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले आहे.
नाशिक शहरात कोरोना प्रादुर्भाव होतोय कमी -
दरम्यान, नाशिक शहरात मागील महिन्याभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतं असल्याचे दिसून येत असून नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण देखील घटले आहे. 28 ऑक्टोबर रोजी नाशिक शहरात 261 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. तर, आता कोरोनाबधितांची संख्या 61 हजार 480 पर्यंत पोहचली आहे. यातील 56 हजार 570 नागरिक कोरोनामुक्त झाले असून 850 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 3 हजार 184 जण उपचार घेत असून शहरात 819 प्रतिबंधित क्षेत्र आहेत.
हेही वाचा - नाशिक: जिल्हाधिकारी आणि कांदा व्यापाऱ्यांची बैठक रद्द, आता विषय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात