नाशिक - नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिंडोरी रोडवरील मुख्य बाजार आवारात येणाऱ्या शेतकरी, हमाल, मापारी, व्यापारी यांची मनपाच्या माध्यमातून अँटीजेन टेस्ट सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी दिवसभरात एकूण ९८ टेस्ट करण्यात आल्या. हे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
संसर्ग वाढू नये यासाठी बाजार समितीची दक्षता -
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिक शहरासह जिल्हाभरातून पालेभाज्याची आवक होत असते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिकमध्ये ता. १२ ते २३ मे पर्यंत कडक लॉकडाऊन केले होते. यात बाजार समित्याही बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र सोमवार (ता.२३) पासून निर्बंध शिथिल करीत बाजार समित्या नियमाचे पालन करीत सुरु करण्यात आल्या. त्यामुळे होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती व नाशिक महापालिकेच्या माध्यमातून रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरू करण्यात आल्या आहेत. मंगळवारी दिवसभरात एकूण ९८ टेस्ट करण्यात आल्या. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत. बाजार समितीत संसर्गित व्यक्ती जाऊन संसर्ग वाढू नये, यासाठी बाजार समितीने ही दक्षता घेतली आहे.
रस्त्यावर शेतमाल विक्री सुरूच -
बाजार समितीमध्ये नियमांचे पालन करीत शेतमाल लिलावांस परवानगी देण्यात आली आहे. तरी वेगवेगळ्या तपासण्यांच्या भीतीने अनेक शेतकरी बाजार समितीत प्रवेश करीत नाहीत. अजूनही अनेकजण रस्त्यावरच शेतमाल विक्री करताना दिसत आहेत. त्यामुळे आता बाजार समिती समोरील रस्त्यांवर गर्दी दिसू लागली आहे.
हेही वाचा - लसीकरणाची निविदा प्रक्रिया टक्केवारीत अडकली का? भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांचा प्रश्न