नाशिक : शहापूर मानस मंदिर येथून नाशिक येथील पवननगर स्थानकात चातुर्माससाठी पायी प्रवास करणाऱ्या, सिद्धायिकाजी, (वय 34) व हर्षायीकाजी (वय 30) या दोन साध्वीचा अपघातात जागीच मृत्यू झाला. त्या चतुर्मासासाठी पायी प्रवास करीत होत्या. याच दरम्यान एक कंटेनर क्रमांक एम. एच. 40 ए. के. 9577 भरधाव वेगात नाशिककडे जात असताना, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनर चालकाने पिकअपला धडक दिली. पिकअपने पायी यात्रेकरूंच्या सोबत असलेल्या ओमनी वाहनास मागून जोरदार धडक दिली. हे ओमनी वाहन पुढे पायी जात असलेल्या दोन्ही साध्वींवर जाऊन आदळले, या भीषण अपघातात कंटेनरच्या चाकाखाली येऊन दोन्ही साध्वींचा जागीच मृत्यू झाला.
चातुर्मास कार्यक्रमाला जात होत्या : अपघाताची माहिती मिळताच कसारा पोलिसांनी घटनास्थली धाव घेतली. रुग्णवाहिकेतून मृतदेह कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात रवाना केले. दरम्यान अपघातानंतर कंटेनर चालक कंटेनर टाकून पळून गेला. पुढील तपास कसारा पोलीस करीत आहेत. अपघाताची माहिती मिळताच इगतपुरी, घोटी, नाशिक भागातील जैन बांधवांनी कसारा प्राथमिक रुग्णालयात गर्दी केली होती. तसेच याप्रकरणी पोलिस तपासात असे आढळून आले की, दोन्ही साध्वी कसारा घाटातून नाशिक येथील पवन नगर येथे जात होत्या. पवन नगरमध्ये चातुर्मासाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कसारा घाट अपघाताचे केंद्र : कसारा घाटात अपघातात 10 दिवसात 3 मृत्यू झाले आहेत. आज पहाटे झालेल्या अपघाताच्या ठिकाणी दहा दिवसापूर्वी पण एका पायी जाणाऱ्या इसमास वाहनाने उडवले होते. त्याचाही जागीच मृत्यू झाला होता. अनेकदा वाहन चालक ओव्हरटेक करताना अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. नेहमीच्या अपघातामुळे कसारा रस्ता वाहतुकीसाठी कठीण होऊन बसला आहे. वाहनधारकांनी देखील या रस्त्यावर वाहने नियंत्रणात चालवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा -