नाशिक - मिग-21, मिग-27, मिग-29, सुखोई-30 सारखे लढाऊ विमानाच्या बांधणीचे आणि दुरुस्तीचे कार्य यशस्वीपणे करणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कारखान्यात काम नसल्याने कारखाना अडचणीत आला आहे. एकीकडे फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेल्या बहुचर्चित राफेल लढाऊ विमानाचे भारतात जोरदार स्वागत करण्यात आलं. मात्र, दुसरीकडे भारतीय हवाई दलासाठी 40 वर्ष अविरतपणे सेवा देणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा (एचएएल) येथील कारखाना काम नसल्याने अडचणीत आला आहे.
भारतीय हवाई दलास भासणाऱ्या लढाऊ विमानाची कमतरता दूर करण्यात नाशिकमधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कारखान्याचा मोठा वाटा आहे. 20 वर्षांपूर्वी रशियन बनावटीची 272 सुखोई विमाने खरेदी करण्याचा निर्णय झाला होता. त्यातील 50 विमाने रेडिमेट घेतली गेली. तर उर्वरित 220 विमाने तंत्रज्ञान हस्तांतर करारान्वये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये तयार करण्यात आली. जवळपास 15 वर्षे हे काम चालले.
हवाई दलाची गरज लक्षात घेऊन, कारखान्यात सुखोई बांधणीला गती देण्यात आली. दर वर्षाला 15 ते 18 विमानांची बांधणी करण्यात आली, हे काम मार्च 2020 मध्ये पूर्ण झाले. सध्या एचएएलमध्ये सुखोईच्या दुरुस्तीचे काम असून नव्याने कुठलाच प्रोजेक्ट नसल्याने कारखान्यात 20 ते 30 टक्के कामाचा तुटवडा जाणवतं आहे.
एचएएल कारखान्यावर अवलंबून असलेले पूरक उद्योगही अडचणीत आले आहेत. सुखोई-30 सारखा प्रोजेक्ट एचएएल कारखान्याला मिळाल्याने या विमानाचे लहान, मोठे, सुटे पार्ट बनवणाऱ्या हजारो स्थनिक उद्योजकांना देखील काम मिळाले होते. मात्र, आता नवे काम न मिळाल्याने याचा फटका एचएएलसह या कारखान्यांवर अवलंबून असलेल्या लहान-मोठय़ा उद्योगांना बसला आहे.
एचएएलमधील कामगार कपातीचे संकट - एचएएल कारखान्यात कायमस्वरूपी साडेतीन हजार कामगार आणि दीड हजार अधिकारी, असे एकूण पाच हजार कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, आता नव्याने काम नसल्याने कंत्राटी स्वरूपात असलेल्या दोन हजार कामगारांपैकी निम्म्यांना कमी करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक कामगारांवर बेरीजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. फारसे काम नसताना कायमस्वरूपी सेवेत असणाऱ्या हजारो अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा भार ‘एचएएल’वर पडत आहे. अशीच परिस्थिती एचएएलवर अवलंबून असलेल्या पूरक उद्योगांच्या कामगारांची देखील झाली आहे.
सुखोई-30 लढाऊ विमान बांधणीचा प्रोजेक्ट मार्च 2020 मध्ये पूर्ण झाला आहे. आता फक्त या विमानांचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे सध्या 20 टक्के कामाचा तुटवडा जाणवतं आहे. एचएएलमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांवर गदा आली आहे. तसेच वेंडर युनिट कामगारांवरही काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे, असे सचिन ढोमसे जनरल सेक्रेटरी (एचएएल कामगार युनियन) म्हणाले.
राफेलचा प्रोजेक्ट एचएएलला मिळावा, ह्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडे देखील पाठपुरावा केला. मात्र, त्याचा फायदा झाला नाही. आम्ही मागील 40 वर्ष देशातील संरक्षण सिद्धतेवर खरे उतरलो आहोत. यापूर्वीचे लढाऊ विमाने बनवण्याचे काम वेळेत पूर्ण केले आहे. सरकारने राफेलसारखा एखादा मोठा प्रोजेक्ट आम्हाला द्यावा, अशी विनंती आम्ही सरकारला करतो, असेही ते म्हणाले.