मनमाड (नाशिक) : कोरोना काळात अनेकांना कित्येक वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले. अगदी मृतदेहामधूनही कोरोनाचा प्रसार होत असल्यामुळे अनेकांना आपल्या सख्ख्या आई-वडिलांवरही अंत्यसंस्कार करता आले नाहीत. काहींनी शासकीय नियमांमुळे, तर काहींनी भीतीपोटी आपल्या नातेवाईकांवर अंत्यसंस्कार करणे टाळले. मात्र, यातच केवळ आपल्या आईच्या अंतिम इच्छेसाठी म्हणून एका तरुणाने तब्बल अडीच महिने शासकीय यंत्रणांशी लढून, अखेर पुन्हा एकदा आपल्या आईवर अंत्यसंस्कार केल्याची घटना नाशिकमध्ये समोर आली आहे.
सुहास क्षीरसागर असे या तरुणाचे नाव आहे. त्यांच्या आई मंजुळा क्षीरसागर यांचा २२ सप्टेंबरला मालेगावच्या कोव्हिड सेंटरमध्ये मृत्यू झाला होता. यावेळी त्यांचा कोरोना अहवाल प्राप्त झाला नसला, तरी कोरोना संशयित असल्याने त्यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्यांकडूनच अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
'झालं ते झालं' म्हणून सोडून नाही दिलं..
अंत्यसंस्कार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंजुळा यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. आपले अंत्यसंस्कार धार्मिक पद्धतीने व्हावेत अशी मंजुळा यांची इच्छा होती. त्यामुळे सुहास यांनी मनमाड आणि मालेगावमधील सामाजिक कार्यकर्ते, तसेच नागरिकांशी संपर्क साधला. यावेळी जे झालं ते झालं, असे म्हणत सर्वांनी त्यांना विषय सोडून देण्यास सांगितले. मात्र, सुहासचा निर्धार ठाम होता.
अडीच महिन्यांचा लढा..
यानंतर सुहास यांनी मनमाड येथील सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांची भेट घेतली. फिरोज शेख यांनी कायदेशीर सल्ला घेऊन सुरवातीला मालेगाव महानगरपालिका व त्यानंतर मालेगाव तहसील कार्यालयात अर्ज दाखल केले. मात्र, कोणीही या अर्जाला दाद दिली नाही. यानंतर फिरोज शेख यांनी मालेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नसीमभाई यांच्या मदतीने माजी आमदार रशीद शेख यांची भेट घेतली. शेख यांनी तात्काळ आयुक्त यांच्यासह संपूर्ण संबंधित विभागाला फोन करून कारवाई करण्याच्या सूचना केल्या. यानंतर अनेक शासकीय कार्यालये, त्यानंतर चर्च या सर्वांचे ना-हरकत दाखले घेऊन शेवटी मंजुळा क्षीरसागर यांचा मृतदेह मालेगाव येथील ख्रिश्चन दफनभूमीतून काढून मनमाड येथे हलविण्यात आला.
जे काही केलं ते आईसाठी केलं..
आई या एका शब्दांत सर्व जग सामावलेलं असतं. आपल्या आईचा मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना असली, तरी आईची अंतिम इच्छा पूर्ण करणं हेही माझं कर्तव्य होतं. त्यामुळे मी सरकारी यंत्रणेशी तब्बल अडीच महिने झटलो आणि सर्वांचं सहकार्य मिळाल्याने माझ्या आईची अंतिम इच्छा पूर्ण करू शकलो. त्यामुळे मी जे काही केलं ते आईसाठीच. मात्र, अशी वेळ कुणावरही येऊ नये..
- सुहास क्षीरसागर, मनमाड
फक्त माणुसकी जिवंत रहावी हाच एकमेव उद्देश..
सुहासवर जो प्रसंग ओढवला तो कोणावरही येऊ शकतो. मात्र, मी अथवा इतर जेही माझ्यासारखे या कामात मदतीला आले त्यांचा सर्वाचा केवळ एकच उद्देश होता; तो म्हणजे माणुसकी जिवंत रहायला हवी. हे जे काही शक्य झाले ते केवळ आणि केवळ भारतीय संविधानामुळे. संविधानाने प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्मानुसार राहण्याची तरतूद करून ठेवली असल्याने हे शक्य झाले, अशी प्रतिक्रिया मनमाडचे सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांनी दिली.
हेही वाचा : महिलेवर डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न...दिंडोरीत धक्कादायक प्रकार