नाशिक - राज्यशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरेशी खबरदारी घेतली आहे. नागरिकांनी भयभीत न होता सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे तसेच अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी शासनाने केलेल्या उपाययोजनांची चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
भुजबळ म्हणाले, कोरोनाबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत जनजागृती करण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता बाळगणे आवश्यक असून गर्दीच्या ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी मास्क व सॅनिटायझर यांचा कृत्रिम तुटवडा होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोरोना विषाणूच्या प्रसारास आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील विपश्यना केंद्रावर येणाऱ्या परदेशी नागरिकांना रोखण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, परदेशातून आलेल्या एकूण 22 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी लक्षणे जाणवलेल्या 5 रुणांची तपासणी केली असता ते रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे नाशिक शहर व जिल्ह्यात कोरोनाग्रस्त एकही रुग्ण नाही. तसेच परदेशातून आलेल्या रुणांना 14 दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून त्यांची त्यांच्या घरीच नियमित तपासणी केली जात आहे. तसेच याबाबत सर्व खासगी रुग्णालयांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा व खासगी रुग्णालयात उपलब्ध सोयी सुविधा व उपकरणांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी डॉ. जगदाळे यांनी जिल्हा रुग्णालयासाठी अधिक चार व्हेंटिलेटर व मॉनिटरची आवश्यकता असल्याचे सांगितले. या बैठकीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आदी उपस्थित होते.