नाशिक - शनिवारी नाशिकमध्ये दिवसभरात ६४५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून नागरिक सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत नसल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यास शहरासह जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्याचा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे.
कडक निर्बंध लावले जातील -
जानेवारी महिन्यापर्यंत आटोक्यात आलेल्या कोरोनाने आता नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे पुन्हा डोके वर काढले आहे. राज्यात दिवसाला आढळणाऱ्या कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा आकडा दहा हजारांच्या पुढे गेला आहे. नाशिकमध्येही तेच चित्र असून नागरिक तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे या नियमांचे सरार्स उल्लंघन करत आहेत. त्यामुळे कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून जिल्हाप्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. यापूर्वी रात्री ११ ते सकाळी ५ या वेळेत संचारबंदी लावण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी जमावबंदीचा आदेश आहे. तरी देखील नागरिक नियमांना जुमानत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन कठोर भुमिका घेण्याच्या मनस्थितीत असून परिस्थिती सुधारली नाही तर पुन्हा लॉकडाऊन लावला जाईल, असा इशारा जिल्हाधिकार्यांनी दिला आहे.
कोरोना संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे सर्रास उल्लंघन -
आपण स्वत:हून कोरोनाचे संकट वाढवत आहोत. त्यामुळे टप्प्याटप्प्याने निर्बंध कठोर करणे किंवा थेट कडक लॉकडाऊन करणे हे दोनच पर्याय आता शिल्लक आहेत. परिस्थिती सुधारते की बिघडते यावर ते अवलंबून आहे. नागरिक कोरोना संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे सर्रास उल्लंघन करत आहेत. व्यक्तिगत कारवाई करून या गोष्टींना आळा घालणे अत्यंत अवघड असल्याने संपूर्ण लॉकडाऊनचा विचार करावा लागत आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.
शनिवारी दिवसभरात ६४५ कोरोना रुग्णांची नोंद -
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अहवालानुसार नाशिक जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात ६४५ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली तर, सहा जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १ लाख १९ हजार ४९० कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ३ हजार ७०९ रुग्णांवर उपचार सुरू असून आत्तापर्यंत २ हजार १३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.