नाशिक - कोरोनाचे उपचार घेणाऱ्या रुग्णांचा मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांनी उपचाराचा होणारा खर्च कमी करण्यासाठी महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.
राज्य शासनाने 23 मार्चपासून महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये कोरोनाचा समावेश केला आहे. यामुळे राज्यातील प्रत्येक नागरिक या योजनेसाठी पात्र आहे. रुग्णांवर या योजनेअंतर्गत अत्यल्प दरात उपचार करणे शक्य झाले आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील केवळ 1 टक्के लोकांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या योजनेसंदर्भात असलेले संभ्रमदेखील त्यांनी दूर केले आहेत.
कोरोनाची बाधा झाल्यास वेळीच रुग्णालयात जाऊन उपचार सुरू करावेत. आधार कार्ड आणि रेशन कार्ड रुग्णालयाला देऊन महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये आपले नाव समाविष्ट करण्यास सांगावे. याबाबत टेलिफोनिक इंटिमेशनची देखील सुविधा उपलब्ध आहे. त्याचाही वापर रुग्णांना व रुग्णालयांना करता येईल. या योजनेसाठी पंकज दाभाडे यांची जिल्हा समन्वयक म्हणून नेमणूक केली आहे. नागरिकांनी या योजनेबाबत काही अडचणी असल्यास दाभाडे यांना 9404594161 या क्रमांकावर संपर्क करावा, असे मांढरे यांनी सांगितले.