नाशिक - जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या शवागरातील वातानुकूलित यंत्र बंद असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याचा सर्वाधिक त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार महानगरपालिका आणि पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे बेवारस मृतदेह अनेक महिने पडून आहेत.
मृत्यूनंतर कोणत्याही परिस्थितीत मृत शरीराची हेळसांड होऊ दिली जात नाही. मात्र, नाशिक जिल्हा रुग्णालय याला अपवाद ठरत आहे. जिल्हा रुग्णालयात असलेल्या शवागारातील ६ वातानुकूलित यंत्रे बंद असल्याने मृतदेह कुजून त्यांची परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. या भागातून जातांना नागरिकांना नाकावर रुमाल लाऊन जावे लागते. या शवागारात आज मितीला ५४ कोल्ड स्टोरेज-असून यातील ६ बंद अवस्थेत आहे. यात सध्या ३९ मृतदेह ठेवण्यात आले आहेत. राज्य सरकारने या शवागाराच्या देखभालीची जबाबदारी सिंधुरी कंपनीला दिली आहे. मात्र, वेळोवेळी पत्र व्यवहार करूनसुद्धा दुरुस्ती होत नसल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनचे म्हणणे आहे.
खरेतर शवविच्छेदन झाल्यानंतर ३ दिवसानंतर बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे ही पोलीस आणि महापालिकेची जबाबदारी आहे. बेवारस मृतदेहांबाबत पोलिसांनी अहवाल दिल्यानंतर महानगरपालिका बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करते. मात्र, या दोन्ही विभागात ताळमेळ नसल्याने महिनो-महिने इथे मृतदेह पडून आहेत.
कोल्ड स्टोरेजमध्ये मृतदेह कुजत नाही हा समज चुकीचा असून फक्त मृतदेह कुजण्याच्या प्रक्रियेचा कालावधी वाढला जात असल्याचे जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पोलीस आणि महानगरपालिकेने आपली जबाबदारी समजून या बेवारस मृतदेहांवर लवकरात लवकर अंत्यसंस्कार करून मृतदेहांची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी होत आहे.