नाशिक - रोटरी क्लब ऑफतर्फे देण्यात येणाऱ्या 'नाशिक भूषण 2019' हा पुरस्कार प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र गोलिया यांना जाहीर करण्यात आला आहे. सोमवारी 20 तारखेला नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते महाकवी कालिदास कला मंदिरातील सभागृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
नाशिक ज्यांची जन्मभूमी अथवा कर्मभूमी आहे, ज्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःबरोबर नाशिकचे नाव उज्ज्वल केले आहे. अशा व्यक्तींना नाशिक भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. रोटरी क्लबच्या नाशिक भूषण पुरस्काराने या आधी कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब शिरवाडकर, प्राध्यापक वसंतराव कानेटकर, शांताबाई दाणी, कुसुमताई पटवर्धन, वसंत पवार, बापू नाडकर्णी, बाळासाहेब वाघ, नरेंद्र जाधव आणि विश्वासराव पाटील यांना सन्मानित करण्यात आले आहे.
यंदाचे नाशिक भूषण नरेंद्र गोलिया यांची नाशिक कर्मभूमी आहे. मुंबईत आयआयटीचे शिक्षण घेऊन त्यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी नाशिकमध्ये विद्युत उपकरणाची निर्मिती करून आपली उत्पादने थेट जर्मनीत निर्यात केली. पुढे इंग्लंड, पोलंड आदी देशातही त्यांनी आपली उत्पादने निर्यात केली. त्यांचे हे काम नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय मानले जाते. सुमारे ५०० कोटींची उलाढाल असलेल्या त्यांच्या ऋषभ इन्स्ट्रुमेंट प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीला आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणवत्तेचे मानांकन प्राप्त केले आहे.