नाशिक- आधारभूत हमी भाव योजनेंतर्गत धान खरेदीचा शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. शेतकऱ्यांना या केंद्राजवळ लागणाऱ्या मूलभूत सोयीसुविधादेखील लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिली. पेठ तालुक्यातील करंजळी येथे आधारभूत हमीभाव योजनेंतर्गत धान खरेदी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी झिरवळ बोलत होते.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले, की शेतकरी शेतात अन्न धान्य पिकवतो. त्या शेतमालाला मिळणाऱ्या भावाला चढ उतार असतात. परिणामी शेतकऱ्याचे नुकसानदेखील होण्याची शक्यता असते. मात्र, आधारभूत हमीभावामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव तर मिळणारच आहे. पण त्यासोबत शेतमालाची विक्री करून मिळणारे पैसे संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे. महामंडळ आधारभूत हमीभावापेक्षा कमी दराने धान खरेदी करणार नाही. तसेच शेतकऱ्यांनीही इतर व्यापाऱ्यांना विक्री करताना हमीभावपेक्षा कमी दराने विकू नये. मग, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असताना आदिवासी विकास महामंडळाला पुन्हा ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. भात गिरण्यांचा प्रश्न नेहमीच उपस्थित होत आहे. त्यासाठी सहकार विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, पेठ तालुक्यातील सहकारी सोसायट्या तसेच या संबंधित असलेल्या संस्था यांसोबत चर्चा करून वरिष्ठस्तरावर निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.
कोरोनामुळे विकासकामांची गती कमी-
कोरोनामुळे विकासकामांची गती कमी झाली आहे. मात्र राज्य सरकार हळूहळू सर्वच स्तरावर विकासकामे सुरू करत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जरी झालेला असला तरीदेखील पूर्णतः नायनाट झालेला नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा प्रशासन यंत्रणा त्यादृष्टीने पूर्णतः तयारीत असल्याचेही झिरवाळ यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यामध्ये आधारभूत हमीभाव केंद्रांतर्गत धान खरेदीमध्ये वाढ-
प्रादेशिक व्यवस्थापक जयराम राठोड यांनी माहिती देताना सांगितले की, शेतकरी तसेच कास्तकरी लोकांना महामंडळातर्फे धान खरेदीबाबत असलेल्या नव्या योजनांची पूर्णपणे माहिती दिली जात आहे. गेल्या 3 वर्षांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये आधारभूत हमीभाव केंद्रांतर्गत धान खरेदीमध्ये वाढ होत आहे. यापूर्वी रोखीने होणारे व्यवहार आता पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्याच्या बँक खात्यात होत आहेत. सध्या, जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये एकूण 25 केंद्रे स्थापन होत आहेत.
असे आहेत दर-
करंजळी येथील आधारभूत केंद्रामध्ये असलेल्या धानाचा प्रति क्विंटल हमीभाव यामध्ये अ दर्जाचा भाताचा दर रु. 1888, साधारण भाताचा दर रु. 1868, हायब्रीड ज्वारीचा दर रु. 2620, मालदांडी ज्वारीचा दर रु. 2640, मक्याचा दर रु. 1850, बाजरीचा दर रु. 2150 तर नागलीचा दर रु. 3295 असल्याचेही प्रादेशिक व्यवस्थापक जयराम राठोड यांनी सांगितले आहे.