नाशिक- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणूची टेस्टिंग लॅब सुरू करावी, अशी मागणी झिरवाळ यांनी मुख्यमंत्र्याेकडे केली आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा राज्यातही प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यादृष्टीने झीरवळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे.
देशाचा विचार केला तर महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसेंदिवस ही रुग्णसंख्या वाढतच आहे. त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यात पण रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक जिल्हाची लोकसंख्या अंदाजे 65 लाख असून सध्या नाशिक येथे कोरोना विषाणूच्या टेस्टिंगसाठी लॅब उपलब्ध नाही. त्यामुळे सध्या कोरोना विषाणू च्या टेस्टिंग साठी सॅम्पल NIV पुणे व भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज धुळे येते जात आहेत. सदरचे टेस्टिंग नाशिक येथे होत नसल्याने रुग्णांच्या चाचणीचा वेळेत रिपोर्ट येत नाही व त्यास बराच विलंब होतो. त्यामुळे रुग्णांवर वेळेत उपचार करण्यास देखील विलंब होतो. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात एक नविन कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करावी, जेणेकरून रुग्णांना वेळेत रिपोर्ट देता येतील. तसेच उपचार पण लवकर सुरू करता येतील. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ व इन्फ्रास्ट्रक्चर मिळावे अशी मागणी विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री, पालकमंत्री यांचेकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेत संबंधितांना तशा सूचना देखील केल्या आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये कोरोना विषाणू टेस्टिंग लॅब सुरू होणार हे नक्की झाले आहे.