नाशिक - कोरोनाच्या कामात डॉक्टर आणि पोलीस यांच्यासारखे आम्ही पण दिवसरात्र आमचा जीव धोक्यात घालून काम करत आहोत. आम्हालाही विमा संरक्षण द्या, अशी मागणी करत राज्यभरातील नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला.
नांदगांव व मनमाड नगरपालिकेच्या सर्व कर्मचारी वर्गाने आज सकाळी कामावर आल्यानंतर सोशल डिस्टन्स ठेवत काळ्या फिती लावून सरकारचा निषेध नोंदवला. डॉक्टर, पोलीस यांच्यासह आम्ही देखील दिवसरात्र कोरोनाच्या लढ्यात सोबत असून आम्हालाही परिवार आहे. त्याचा विचार करत आम्हालाही विम्याचे संरक्षण कवच द्यावे, अशी मागणी करत कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत काम केले. या विभागात सर्व कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला होता. सरकारने सर्वच अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्यावे, अशी मागणीही यावेळी केली.