नाशिक- महापुरानंतर गोदाकाठ परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पुरामुळे मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढण्यासाठी महानगरपालिकेकडून स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. संपूर्ण स्वच्छता करण्यासाठी किमान दोन ते तीन दिवस लागतील, असे अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
4 ऑगस्टला गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे नाशिकचा बहुतांशी भाग जलमय झाला होता. 50 वर्षानंतर आलेल्या या महापुराने अक्षरशः जलतांडव केले होते. या महापुराच्या पाण्याने गोदावारी काठच्या परिसराला आपल्यात सामावून घेतले होते. या पुरामुळे अनेक घरे, दुकाने पाण्याखाली गेली. यात अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. महापुरामुळे नाशिकचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते.
मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गोदावरी नदीचा पूर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. तसेच गंगापूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. रामकुंड परिसरातील पाण्याखाली गेलेली मंदिरे काही प्रमाणात दिसू लागली आहे. मात्र, आता पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेला चिखल काढण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे. तसेच नाशिक महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाने यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. पंचवटी परिसरातील सराफ बाजार, रामकुंड परिसरात अग्निशामक विभागाकडून रस्त्यावर साचलेला गाळ काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, असे असले तरी संपूर्ण स्वच्छता करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतील असे महानगरपालिकेचे म्हणणे आहे.