नाशिक - निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर देशभरात राजकारणात चर्चांना उधान आले आहे. त्यातच 'काही झाले तरी नरेंद्र मोदीच 2024 मध्ये पंतप्रधान होतील' अशी भूमिका भाजप नेत्यांनी मांडली आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला खोचक टोला लगावला आहे. '2024 लोकसभा निवडणुकीत मोदीच पंतप्रधान होतील. आम्ही कुठे म्हणतो नाही होणार', असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
'शिवसेनेचा मुख्यमंत्री पूर्ण 5 वर्षे राहील'
संजय राऊत आज (12 जून) नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी ते म्हणाले, की 'प्रशांत किशोर आणि उद्धव ठाकरे यांच्याही अनेक भेटी झाल्या. त्यांच्या यंत्रणेचा फायदा सर्वच राजकीय पक्ष घेतात. प्रत्येक पक्षाला अशा यंत्रणेची गरज असते. मात्र, लोकसभा निवडणुकीचे आखडे आता मांडता येणार नाहीत. शिवसेनेचा मुख्यमंत्री पूर्ण 5 वर्षे राहिल. यात कोणत्याही वाटाघाटी नाहीत. असं आमचं ठरलंय. काँग्रेस पक्षातच नाही तर अनेक पक्षात मुख्यमंत्री पदासाठी दावेदार आहेत. मुख्यमंत्री पदाची इच्छा असणे गैर नाही'.
'मराठा आरक्षणासाठी दिल्लीत मोर्चा काढावा'
'मराठा आरक्षणाबाबात केंद्र सरकारच ठाम भूमिका घेऊ शकते. संभाजीराजे यांनी दिल्लीत मोर्चा काढावा. दिल्लीत एक मराठा लाख मराठा ताकद दाखवावी. महाराष्ट्राने मराठा आंदोलनाची ताकद बघितली आहे. ही ताकद आता दिल्लीत दाखवावी', असेही संजय राऊतांनी म्हटले.
हेही वाचा - अन् शिवसेना आमदाराने कंत्राटदारालाच बसवलं नाल्यात; कचऱ्याने घातली अंघोळ