नाशिक - आडगाव परिसरात अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरणाऱ्या सात वर्षीय बालकाची हत्या करून फरार झालेल्या नराधम प्रियकरास आणि त्यास मदत करणाऱ्या मुलाच्या निर्दयी मातेस आडगाव पोलिसांनी जेरबंद केले. मुलाला मारून मुलास त्याच्या आईने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. २१ डिसेंबर २०२० रोजी घराबाहेर खेळताना पडून जखमी झालेल्या नांदूरनाका येथील ७ वर्षीय मुलास त्याच्या आईने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखले केले. डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले होते. त्यावरून आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
निष्पाप बालकाचे डोके भिंतीवर आपटले
पोलिसांनी केलेल्या या मृत्युच्या चौकशीत अत्यंत संतापजनक प्रकार उघड झाला. संशयित सोमनाथ उर्फ योगेश वसंत कुऱ्हाडे (वय २२, रा. साईनगर, नांदूरगाव, नाशिक) याने हा लहान मुलगा त्याच्या प्रेयसीला पहिल्या पतीपासून झालेला असून त्याचा सांभाळ करावा लागेल. तसेच प्रेयसीसोबत अनैतिक संबंधात त्याचा अडसर निर्माण होत होता. म्हणून संशयित योगेश हा लहान मुलास नेहमी कमरेच्या बेल्टने व लाथाबुक्यांनी मारहाण करीत असे. दि. २१ डिसेंबर रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास संशयिताने त्याच्या घरात त्या निष्पाप बालकाचे डोके जोरात भिंतीवर आपटले. यात जखमी झालेल्या त्या लहान मुलास मुलाच्या आईने दुसऱ्या दिवशी (दि.२२) सकाळी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी चुकीचे नाव सांगून दाखल केले. यातील संशयित महिलेने तिचा मुलगा संशयित सोमनाथने केलेल्या मारहाणीत जखमी झाला आहे, हे माहीत असतानाही वैद्यकीय अधिकाऱ्यांना गुन्हा लपविण्याच्या हेतूने खोटी माहिती दिली. विशेष म्हणजे पोटचा मुलगा मयत झाल्यानंतरही त्याचा मृतदेह ताब्यात न घेता ती पळून गेली होती.
आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल
संशयित सोमनाथ आणि महिला संशयित यांच्याविरुध्द आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. डीबी पथक व महिला पोलीस अंमलदार यांनी तत्काळ शोध घेऊन संशयितांना ताब्यात घेत या गुन्ह्याचा छडा लावला. गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख हे करीत आहेत. दोन्हीही संशयितांना पोलीस कोठडी मिळणेकामी रविवारी न्यायालयात हजर केले आहे.