नाशिक Misused Of Deepfake System : डीपफेक तंत्रज्ञानाचा ( Deepfake Video) वापर मनोरंजनासाठी होत असला तरी दुसऱ्या बाजूला नेत्यांच्या तोंडी दुसऱ्याच नेत्यांची वक्तव्यं घालून बदनामीचा प्रयत्न करणे, पॉर्न इंडस्ट्रीमध्ये कलाकारांच्या चेहऱ्यावर काही प्रसिद्ध व्यक्तींचा चेहरा वापरून त्यांना बदनाम करणे अशा या ना त्या घटना गेल्या काही वर्षांत समोर आल्या आहेत. 2019 पर्यंत इंटरनेट जगात 15 हजार डीपफेक व्हिडिओ अस्तित्वात आले आहेत. डीपफेक व्हिडिओतील 94 टक्के पात्रं ही मनोरंजन क्षेत्रातील संबंधित व्यक्ती आहेत. मात्र 2019 नंतर डीपफेक व्हिडिओचा गैरवापर वाढला असल्याचं समोर आल्याचं सायबर तज्ज्ञ तन्मय दीक्षित यांनी सांगितलं.
काय आहे डीपफेक प्रणाली? डीपफेक हे बनावट फोटो आणि व्हिडिओ तयार करण्याचं तंत्रज्ञान असून कृत्रिम बुद्धिमत्ता प्रोग्रामिंग आणि विशिष्ट अल्गोरीदमचा त्यात वापर केला जातो. एखाद्या व्यक्तीची अनेक छायाचित्रे आणि चित्रफित डीपफेक प्रणालीत फीड करून त्याचा चेहरा दुसऱ्या व्यक्तीशी जोडला जातो, तसंच आवाजही दिला जातो. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील विविध हावभाव, चेहऱ्यावर असलेले डाग, सुरकुत्या, त्वचेचा रंग, चेहऱ्याच्या हालचाली, व्यक्तीचे ओठ, गाल अगदी हुबेहूब तयार केले जातात. ती व्यक्ती कशी हसते कशी रडते किंवा रागाच्या भरात कशाप्रकारे प्रतिउत्तर देते हे देखील सहजपणे या डीपफेक प्रणालीत तयार केले जाते.
3 वर्षांची आहे शिक्षा : बदनामी करणाऱ्या व्हायरल डीपफेक व्हिडिओ नंतर केंद्राने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक नियम स्मरणपत्र पाठवले आहेत. यात तीन वर्ष तुरुंगवास आणि एक लाख दंड अशी दंडाची तरतूद आहे. केंद्राने ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला 36 तासांच्या आत मॉर्फ केलेले फोटो काढून टाकण्यास सांगितले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सोशल मीडिया कंपन्यांनी नियमानुसार काम न केल्यास इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय कारवाई करील असेही सांगण्यात येत आहे. डीपफेक हा अतिशय धोकादायक आणि हानिकारक प्रकार आहे. समाजमाध्यमांनी याचा सामना करणे आवश्यक असल्याचं तज्ज्ञ व्यक्तींनी सांगितलं आहे.
हेही वाचा: