नाशिक- एकीकडे नाशिक स्मार्टसिटीकडे वाटचाल करत असताना याच नाशिक जिल्ह्यामध्ये तब्बल 12 हजारहून अधिक बालके कुपोषित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पावसाळ्यापूर्वी जिल्हा परिषदेने केलेल्या एका सर्वेक्षणात ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
मागच्या काही दिवसांपासून राज्य सरकार कुपोषित बालकांवर मोठ्या प्रमाणात काम करत असताना देखील अद्यापही कुपोषण रोखण्यात सरकार आणि स्थानिक प्रशासनाला यश आले नाही.
नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी बहुल भाग आहे. त्यामुळे आदिवासी भागातच अधिक कुपोषित बालक आढळून आले आहेत. आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीतून १२ हजार ६९९ बालके कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. त्यात २ हजार ८९३ बालके अतितीव्र कुपोषित म्हणून आढळून आले, तर ९ हजार ८०६ बालके मध्यम कुपोषित आहेत.
कुपोषण झालेल्या काही बालकांवर नाशिक जिल्हा रुग्णालय आणि स्थानिक आरोग्य विभागात उपचार सुरू करण्यात आले आहेत. पण एकूणच नाशिकसारख्या मोठ्या शहरातदेखील इतक्या मोठ्या प्रमाणात कुपोषित बालक आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
खरेतर या कुपोषणावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे मोठ्या प्रमाणात निधी येत असतो. असे असताना देखील अद्यापही कुपोषणावर मात नाशिक प्रशासनाला करता आले नाही. तसेच आजही ग्रामीण भागाकडे आरोग्य विभाग फारसे लक्ष देत नाही हेच या सगळ्या आकडेवारीवरून समोर येत आहे. तोपर्यंत या संदर्भात ठोस उपाययोजना होत नाहीत तोपर्यंत हे आकडेवारी कमी करणे अशक्य आहे.