नाशिक Minor Girls Becomes Mother : जिल्हा शासकीय रुग्णालयात मागील पाच दिवसात तीन अल्पवयीन मुलींची प्रसूती झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रसूतीबाबत जिल्हा रुग्णालयाकडून वैद्यकीय पोलीस चौकीत तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी ही बाब गांभीर्यानं घेतली आहे. हे बालविवाह आहेत, की अत्याचार याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
अल्पवयीन मातांनी बाळाला दिला जन्म : नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हाभरातून वेगवेगळ्या आजारांवर उपचार घेण्यासाठी रोज शेकडो रुग्ण येतात. अशात मागील पाच दिवसात या तीन अल्पवयीन मातांनी बाळांना जन्म दिल्याची बाब समोर आली आहे. देशभरात बालविवाहाचा कायदा लागू असताना, ग्रामीण भागातून आलेल्या तीन अल्पवयीन मुलींनी बाळाला जन्म देत या कायद्याच्या अंमलबजावणीलाच हरताळ फासला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंद करण्यात आलेली असून हे बालविवाह आहेत, की अत्याचार याबाबत तपास करण्यात येत आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात ही आहेत प्रकरणं : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या महिलांच्या प्रसूती वॉर्डमध्ये गेल्या 19 नोव्हेंबरला एक अल्पवयीन गरोदर मुलीला दाखल करण्यात आलं होतं. या मुलीचं वय अवघं 13 वर्षे 11 महिने आणि 17 दिवस होतं. या अल्पवयीन गर्भवती मुलीला प्रसूतीसाठी तिच्या आईनं दाखल केलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गेल्या सोमवारी मध्यरात्री तिची प्रसूती होऊन तिनं मुलीला जन्म दिला. ही अल्पवयीन मुलगी निफाड तालुक्यातील आहे. दुसऱ्या प्रकरणात अल्पवयीन गर्भवती मुलगी ही 17 वर्षे 11 महिने 9 दिवस वय असलेली असून ती पेठ तालुक्यातील आहे. तिच्या आईनं तिला 13 नोव्हेंबर रोजी प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं. 16 नोव्हेंबरला या अल्पवयीन मुलीनं मुलाला जन्म दिला आहे. तर, तिसरी मुलगी ही चांदवड तालुक्यातील असून, तिचं वय 16 वर्षे 5 महिने आणि 20 दिवस आहे. या अल्पवयीन मुलीची गेल्या 13 नोव्हेंबर रोजी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती होऊन तिनं मुलीला जन्म दिला आहे. परंतु जन्मत:च तिचं वजन कमी असल्यानं चांदवड उपजिल्हा रुग्णालयातून अधिक उपचारासाठी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
शासनाला बालविवाह रोखण्यात अपयश : या तीनही प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलीस चौकीमध्ये माहिती कळवण्यात आली आहे. त्याप्रमाणं पेठ, निफाड आणि चांदवड पोलीस ठाण्यांना यासंदर्भातील माहिती पोलिसांनी कळविली आहे. शासनानं अल्पवयीन मुलींच्या संरक्षणासाठी कडक कायदे केले आहेत. असं असतानाही बालविवाह रोखण्यात शासन अपयश ठरत आहे. अल्पवयीन माता रोखण्यातही कायद्याच्या कठोर अंमलबजावणीअभावी अपयशच आल्याचं या तीन घटनांवरुन स्पष्ट होत आहे. तिन्ही प्रकरणात पोलिसांनी कायदेशीर तक्रार नोंदवून प्रसूती झालेल्या मुलींसह त्यांच्या आईवडिलांचे जबाब नोंदणी सुरू केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कायद्याची अंमलबजावणी होत नाही : "आज नाशिक जिल्हा रुग्णालयात तीन अल्पवयीन मुलींनी बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली. मात्र आदिवासी भागात शेकडो अल्पवयीन मुलींचे आजही बालविवाह होत आहेत. मागील काही महिन्यात मी स्वतः आठ बालविवाह रोखले आहेत. मात्र, कारवाई करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. कायदा जरी चांगला असला, तरी त्याची योग्य अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. आजही आदिवासी भागामध्ये बालविवाह, कुपोषण, बालमृत्यू या सारख्या समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. आदिवासी नागरिकांबद्दल शासनानं अनेक चांगले कायदे केले आहेत, मात्र त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही. तसेच बालविवाह रोखण्यासाठी प्रबोधन होत नाही" अशी टीका एल्गार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांनी केली आहे.
हेही वाचा :