नाशिक - आदित्य ठाकरे यांनी मालेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे हे निवडणूक लढण्यास तयार झाले तर आम्ही त्यांना बिनविरोध निवडून आणू अन्यथा निवडणूक झालीच तर आम्ही 1 लाखाहून अधिक मताधिक्याने आदित्य यांना निवडून आणू, असा विश्वास दादा भुसे यांनी व्यक्त केला. ठाकरे यांच्या रूपाने मालेगाव मतदारसंघाला एक युवानेता मिळेल आणि मतदारसंघाचा विकास होईल, अशी अशा मालेगावकरांमध्ये असल्याचे भुसे यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे कुठून विधानसभा निवडणूक लढवणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. या आधी देखील आदित्य ठाकरे यांनी मुंबई, जळगावमधून निवडणूक लढवावी, अशी मागणी तेथील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केली आहे. आदित्य ठाकरे सध्या जन आशीर्वाद यात्रेसाठी नाशिक दौऱ्यावर आहेत.