नाशिक - कोरोनामुळे करण्यात झालेल्या लॉकडाऊनमुळे मी आर्थिक अडचणीत सापडलो आहे. रोज रिक्षा चालवली तर पैसे मिळतात आणि त्यातून मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मात्र, ह्या दीड महिन्यांच्या काळात माझी आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक मित्र परिवाराकडून 8 ते 9 हजार पैसे उधार घेतले. मात्र, ते पैसेही संपत आल्याने आता रिक्षाने कुटुंबासह माझ्या मूळ गावी जोनपूर (उत्तर प्रदेश) येथे जाण्यासाठी निघालो आहे. पाच-सहा दिवसात आम्ही आमच्या गावाला पोहचणार आहोत, अशा भावना घाटकोपर येथे रिक्षा चालविणाऱ्या राम गोस्वामी यांनी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीसमोर व्यक्त केल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनला दीड महिन्यांचा कालावधी झाला आहे. त्यामुळे हातावर पोट असलेले अनेक जण आपल्या मुळ गावी जाण्यासाठी निघाले आहेत. त्या पैकीच एक आहे राम गोस्वामी. राम हा मुंबईत घाटकोपरमध्ये रिक्षा चालवून आपली उपजिवीका करतो. मात्र लॉकडाऊनमुळे त्याला काहीच करता येत नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ त्याच्यावर आली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठीच त्याने थेट आपल्या उत्तर प्रदेशातील मुळ गावी जाण्याचा मार्ग अवलंबला आहे. त्यासाठी तो जी रिक्षा चालवतो तीच घेवून उत्तर प्रदेशला निघाला आहे. त्याच्या कुटूंबातील ४ जणांसह तो निघाला आहे. शिवाय अन्य रिक्षा चालकही रिक्षाने उत्तर प्रदेशाकडे रवाना झाल्याची माहितीही त्याने दिली आहे.
मुंबईमध्ये हजारोंच्या संख्येने रिक्षा चालक आहेत. त्यामध्ये उत्तर भारतीयांचा संख्या मोठी आहे. लॉकडाऊन संपेल अशी आशा त्यांना होती. मात्र तो वाढत चालला आहे. अशा स्थितीत मुंबईत राहणे त्यांच्यासाठी कठीण झाले आहे. म्हणूनच आपले गाव बरे म्हणत हे सर्व जण गावाकडे निघाले आहेत.
हेही वाचा - नातेवाईकांच्या वाहनांची तपासणी केल्याच्या रागातून जमावाच्या मदतीने पत्रकाराची पोलिसांना मारहाण