नाशिक - गंगा, कावेरी, गोदावरी, नर्मदा यांसह देशातील प्रमुख नद्या अविरत निर्मल व्हाव्या, यासाठी स्वामी शिवानंद यांनी हरिद्वारला उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून नाशिकच्या पर्यवरण प्रेमींनी नाशिकच्या गोदावरी नदी काठी उपोषण सुरू केले होते. यात पर्यावरण प्रेमी योगेश बर्वे यांनी केस न काढण्याचा संकल्प घेतला होता. जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या आवाहनानंतर सरकारने मागण्यासंदर्भात होकार दर्शवला. यानंतर स्वामी शिवानंद यांनी उपोषणाची सांगता केली. यामुळे नाशिकमध्ये योगेश बर्वे यांनी देखील मुंडन करून संकल्प पूर्ण केला. यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी उपोषणस्थळाला भेट दिली आणि 'नदी बचाव-देश बचाव'चा नारा दिला.
'नदी बचाव देश बचाव' - मेधा पाटकर
'देशाच्या उप नद्या प्रदूषण मुक्त होऊन अविरत निर्मल व्हाव्या, यासाठी 79 वर्षीय स्वामी शिवानंद यांनी 30 दिवस उपोषण केले. देशातील प्रत्येक नदी मग ती गोदावरी, कावेरी, गंगा, नर्मदा या निर्मळ वाहत राहिल्या पाहिजे, आज सर्वच ठिकाणी नदीत काँक्रीटीकरण होत आहे, नद्यात प्रदूषण होत आहे, नद्यांत घाण टाकली जात आहे, विशेष म्हणजे नदीत धरणं बांधली जात आहे, हे कुठं तरी थांबलं पाहिजे, आज अमेरिकासारख्या देशाने हजार धरणं तोडून टाकत नद्या पुनर्जीवित केल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने त्याचा आदर्श घेतला पाहिजे.आपण निसर्गा विरोधात जात असल्याने दुष्काळ आणि पुराचे थैमान भोगावे लागत आहे. नदी वाचली तर देश वाचेल यासाठी सरकार सोबत सर्वांनींच प्रयत्न केले पाहिजे.' असे मेधा पाटकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - 'मिठी' नदीला 'मिठी' करण्यासाठी कसली कंबर...'या' मंत्र्यांनी करारावर केल्या स्वाक्षऱ्या