नाशिक- राज्यात बर्ड फ्लूची साथ आली आहे. बर्ड फ्लूचा शहरात प्रसार होऊ नये, यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने उपाय योजना राबवण्यात येत आहेत. शहरात कुठेही मृत पक्षी आढळून आल्यास त्याची माहिती महापालिकेच्या संबंधित विभागाला देण्याचे आवाहन आयुक्तांकडून करण्यात आले आहे.
राज्यात काही दिवसांपूर्वी परभणी जिल्ह्यातील मुरुंबा येथे 800 कोंबड्यांचा बर्ड फ्ल्यूने मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं, त्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. तर दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या विविध भागांमध्ये पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचं आढळून आलं होतं. मात्र शहरात अद्याप बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला नाही, बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने उपाय योजना राबवण्यात येत आहेत. मनपाच्या वतीने आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच मृत पक्षी आढळून आल्यास महापालिकेच्या संबंधित विभागाला माहिती देण्याचे आवाहन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा आणि इगतपुरी तालुक्यात देखील कावळा, चिमणी आणि भारद्वाज या पक्ष्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र या मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, अहवाल आल्यानंतरच पक्ष्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे अवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.