नाशिक: आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूकचे प्रमाण वाढले आहे. अशाच नवनवीन फंडे वापरून नागरिकांना आर्थिक गंडा घातला जात आहे. सध्या फेसबुकवर एक विधवा तरुणी आणि तिच्या सोबत एक महिला असलेला व्हिडीओ बघावयास मिळत असून, या व्हिडीओचा वापर करून तरुणांना आर्थिक गंडा घातला जातं असल्याचे समोर आलं आहे.
नागरिकांची आर्थिक फसवणूक: सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन फंडे वापरून नागरिकांना गंडा घालण्याचा प्रकार नित्यनियमाने सुरू आहे. कधी लॉटरीचे आमिष दाखवून तर कधी नोकरीचे, कधी हनी ट्रॅपमध्ये कडकून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जाते. बनवेगिरीचा असाच एक नवा फंडा सोशल मीडियावर विशेषत: फेसबुकवर बघावयास मिळत असून, आतापर्यंत त्यास अनेकजण बळी पडले आहेत. एक विधवा तरुणी अन् तिच्यासोबत एक महिला असलेला व्हिडीओ फेसबुकवर हमखास बघावयास मिळत असून या विधवा महिलेशी लग्न करा अन् कोट्यधीश व्हा, असे या व्हिडिओमधून ही महिला सांगताना दिसून येते. नेट युजर्स त्यास प्रतिसाद देत आपला मोबाइल नंबर त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करत जाळ्यात ओढले जात आहे.
कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी: या व्हिडिओमध्ये दोन महिला दिसून येतात. त्यातील एक तरुणी विधवा असल्याचे दाखविले जाते. तर दुसरी वयोवृद्ध महिला नेट युजर्सला तिच्याशी लग्न करण्याचे आवाहन करताना दिसते. त्यामध्ये ती म्हणते की, ही तरुणी विधवा आहे. तिच्या पतीचे नुकतेच कार अपघातात निधन झाले आहे. त्याच्यापासून ही दोन महिन्याची गर्भवतीदेखील आहे. तिची कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे जो कोणी तिच्याशी लग्न करणार त्याला ती प्रॉपर्टी दिली जाईल. त्यामध्ये फ्लॅट, कार, कॅश, सोने असे सर्व काही त्याला दिले जाईल. शिवाय या सुंदर मुलीशी लग्न केले जाईल. त्यामुळे हिच्याशी लग्न करण्यास जो कोणी उत्सुक आहे. त्याने आपला मोबाइल क्रमांक कमेंटस् बॉक्समध्ये शेअर करावा, आम्ही त्याला योग्य वेळी संपर्क करू, असे आवाहन या महिलेकडून केले जाते.
मग दिली जाते धमकी: इच्छुक तरुणांनी कमेंट बॉक्समध्ये नंबर शेअर केल्यानंतर भामट्यांकडून त्या मोबाइल नंबरवर संपर्क साधून त्या तरुणाची विचारपूस केली जाते. जवळपास दोन ते तीन दिवस त्या तरुणाला सातत्याने या, ना त्या कारणाने संपर्क साधला जातो. त्या तरुणाचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याच्याकडे पैशांची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास त्याला धमकविले देखील जाते.
पैशांची मागणी: नाशिकच्या सातपूरमधील एक अविवाहित तरुण अशाच प्रकारे या व्हिडिओच्या जळ्यात अडकला आहे. गेल्या 15 दिवसांपासून त्याला तरुणीचे फोन येत असून, त्याच्याकडे पैशांची मागणी केली जात आहे. माझे घर मृत पतीच्या नावावर असून ते घर आपल्या दोघांच्या नावावर करायचे आहे. त्याकरिता 60 हजार रुपये खर्च येणार आहे. माझ्याकडे सध्या तेवढे पैसे नाहीत. कारण जे पैसे आहेत, ते पतीच्या अकाउंटमध्ये आहेत. माझ्या खात्यावर येण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे. अशात तू मला आता पैसे दे, लग्नानंतर हे सर्व काही तुझेच होणार आहे. अशा प्रकारचे आमिष या तरुणाला दाखविले जात आहे. मात्र आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने आता त्याला धमकावले जात आहे.