मनमाड (नाशिक) - मनमाड शहराच्या अगदी नजीक असलेल्या मालेगावात कोरोनाबधितांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने मनमाडमध्येही खबरदारी घेतली जात आहे. मनमाड शहरात आठवड्यातून फक्त 3 दिवस किराणा, भाजीपाला, मांस, बेकरी दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय नगर परिषद प्रशासनाने घेतला आहे. तर आज पासून 2 दिवस शहरात सर्व प्रकारचे दुकाने, विक्री केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे. फक्त दूध विक्री, औषधांची दुकाने आणि दवाखान्यांना यात सूट देण्यात आली आहे. शहरातील पेट्रोल पंपावरील इंधन विक्रीवरही निर्बंध घालण्यात आले आहे.
मनमाड नगर परिषद मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक समिरसिंग साळवे यांनी पेट्रोल पंप मालकांची संयुक्त बैठक घेऊन आता केवळ सकाळी 8 ते 12 व दुपारी 4 ते 8च पेट्रोल पंप सुरू राहणार आहे.
मनमाडनजिक असलेल्या मालेगाव चांदवड लासलगाव कोपरगाव याठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. मालेगाव शहरातील संख्या तर रोज वाढतच आहे. यावर खबरदारी म्हणून मनमाडलादेखील पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने अनेक गोष्टींवर निर्बंध लावले आहेत. रोज भरणारा भाजी बाजार आता एक दिवसाआड तर किराणा दुकानेदेखील काही वेळापूरते सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे पेट्रोल पंपावर होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी शहरातील सर्व पेट्रोल पंप आता सकाळी 7 ते 12 व दुपारी 4 ते 8 या वेळेतच सुरू राहणार आहे.
पोलिसांनी आणि पालिकेच्या वतीने अनेकांवर दंडात्मक कारवाई करून देखील रस्त्यावर होणारी गर्दी कमी होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मालेगाव शहरातील कोरोनाबाधिताची संख्या जवळपास 62 झाली आहे मनमाड मालेगाव अंतर कमी आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने या उपाययोजना सुरू आहेत. आजपर्यंत एकही रुग्ण मनमाड शहरात सापडलेला नाही त्या दृष्टीने मनमाडकरांनी देखील सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर यांनी केले आहे.