मनमाड - कृषी कायद्यांविरोधात आज मंगळवारी शेतकऱ्यांकडून भारत बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद असणार आहेत. मनमाड, नाशिक, मालेगाव आणि नांदगांव यासह जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील शेतमालाचा लिलाव आज बंद राहणार आहे. बंदला बाजार समिती संचालक मंडळानेही पाठिंबा दिला आहे. आज त्रास होईल. मात्र, हे विधेयक रद्द झाले नाही. तर आयुष्यभर त्रास होईल, असेही शेतकरी बांधवांनी सांगितले.
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असुन नवीन कृषी कायदे लवकरात लवकर रद्द करावे, यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनास महाराष्ट्र राज्याने देखील पाठिंबा जाहीर केला आहे. जोपर्यंत नवीन कृषी कायदे रद्द होत नाही. तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.
कडकडीत बंद -
भारत बंद दरम्यान आपत्कालीन सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही याबाबत आपण विशेष काळजी घेणार असल्याचे शेतकरी संघटनांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.शेतकऱ्यांच्या या हाकेला देशभरातून प्रतिसाद मिळतो आहे. बरेच विरोधी पक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचे बार असोसिएशन यांनीही आजच्या बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आज देशभरात कडकडीत बंद पाळला जाण्याची चिन्हे आहेत.